राजस्थान राज्य हे काँग्रेससाठी डोकेदुखी बनला आहे. एकाला शांत करावे तर दुसरे डोळे दाखवतो, अशी परिस्थिती राजस्थानमध्ये झाली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर आता पुन्हा गुर्जर समाजातील एका नेत्याने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. अन्यथा डिसेंबर महिन्यात येणाऱ्या ‘भारत जोडो यात्रे’ला रोखण्यात येईल, असा इशारा गुर्जर नेत्याने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भारत जोडो यात्रे’चा मध्यप्रदेशमधील टप्पा सुरु झाला आहे. डिसेंबर महिन्यात ही यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करेल. त्यापूर्वीच गुर्जर समाजाचे नेते कर्नल बैन्सला यांचे पुत्र विजय बैन्सला यांनी गुर्जर समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावे, तरुणांना नोकऱ्या द्याव्या आणि सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनावावे, अशा मागण्या ठेवल्या आहेत. या मान्य न झाल्यास राहुल गांधींच्या यात्रेला विरोध करणार असल्याचं बैन्सला यांनी सांगितलं.

हेही वाचा : सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतरही नांदेडमधील सत्ताधारी खासदार आमदारांमध्ये शुकशुकाट

विजय बैन्सला म्हणाले की, “सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. तसेच, सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री बनवावे. त्यांना मुख्यमंत्री केलं तर राहुल गांधींचे स्वागत करु. नाही केलं तर, ‘भारत जोडो यात्रे’ला राजस्थानमध्ये पाय ठेऊन देणार नाही. कारण, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी गुर्जर समाजाने काँग्रेसला मतदान केले होते,” असा दावा विजय बैन्सला यांनी केला.

हेही वाचा : केरळमधील थरुरांचे व्याख्यान रद्द केल्याचं प्रकरण; “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या…”, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप

तर, विजय बैन्सला यांच्या वडिलांचे सहकारी शैलेंद्र सिंग धाभाई यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “विजय बैन्सला यांनी स्वत:ला समाजाचे नेते म्हणून कधी घोषित केले माहिती नाही. गुर्जर समाज महापंचायत बोलवून आपला नेता निवडतो. समाजाच्या प्रश्नांबाबत सरकारशी बोलणे झालं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या यात्रेला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही गेलहोत यांना विरोध करु आणि करत राहू,” अशी स्पष्टोक्ती शैलेंद्र सिंग धाभाई यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make sachin pilot chief minister or stop bharat jodo yatra gurjar leader vijay bainsla warna congress ssa