केरळचे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि प्रदेश भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर ऊर्फ रामासिम्हन अबुबकार (वय ६०) यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. मागच्या काही आठवड्यापासून भाजपापासून फारकत घेणारे ते तिसरे सिनेसृष्टीशी संबंधित पदाधिकारी आहेत. अकबर यांनी जवळपास २० चित्रपटांची निर्मिती केली आहे. मागच्यावर्षी त्यांनी इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी रामासिम्हन अबुबकार हे नाव धारण केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामासिम्हन यांनी शुक्रवारी फेसबुक पोस्ट टाकत आपला निर्णय जाहीर केला. केरळचे भाजपा अध्य के. सुरेंद्रन यांना उद्देशून एका ओळीत त्यांनी आपला राजीनामा लिहिला आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मी कोणत्याही राजकारणाचा गुलाम नाही. आता सर्वांपासून मुक्त झालो असून फक्त धर्मासोबत उभा आहे.

भाजपा पक्षातील एक महत्त्वाचा मुस्लीम नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पण ऑक्टोबर २०२१ रोजी पक्षाच्या कार्यकारिणीची पुनर्रचना केल्यानंतर त्यांनी प्रदेश कार्यकारिणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते फक्त पक्षाचे प्राथमिक सदस्य म्हणून काम करत होते. उत्तर केरळमधील मुस्लीम जनतेमध्ये संघ परिवाराच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी भाजपाने अकबर यांची नियुक्ती केली होती. अकबर यांनी १९२१ च्या मलाबार बंडावर आधारीत “हिंदू साईड ऑफ द रिबेलियन” या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच लव्ह जिहाद विरोधातल्या प्रचारासाठी ख्रिश्चन समुदायानेही अकबर यांना काहीवेळा समर्थन दिले होते.

मागच्या आठवड्यात, प्रतिष्ठित मल्याळम चित्रपट दिग्दर्शक राजासेनन यांनीही भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. राजासेनन यांनी २०१६ साली भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांनी आता सीपीआय (एम) पक्षात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “भाजपामध्ये एक कलाकार आणि राजकारणी म्हणून मला दुर्लक्षित केले गेले. त्यामुळे मी सीपीआय (एम) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे कलाकारांना मोकळीक देण्यात येते.”, अशी प्रतिक्रिया राजासेनन यांनी भाजपातून बाहेर पडल्यानंतर दिली.

रामासिम्हन आणि राजासेनन यांच्या व्यतिरिक्त अभिनेते भीमन रघू यांनीही भाजपातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. भीमन रघू यांनी मागची विधानसभा निवडणूक भाजपाच्या तिकीटावर लढविली होती. मागच्या आठवड्यात माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही रघू यांनी सांगितले.

भाजपाचे प्रवक्ते नारायणन नंबूथिरी यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अली अकबर हे गेल्या काही काळापासून पक्षात सक्रीय नव्हते. त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय वैयक्तिक स्वरुपाचा आहे. एक कलाकार म्हणून त्यांचा निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. तसेच राजासेनन यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, राजसेनन यांना पक्षाकडून काय अपेक्षित होते, हे आम्हाला कळालेले नाही. ज्या कलाकारांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांना केरळ सिनेसृष्टीत बहिष्काराचा सामना करावा लागत होता. राजासेनन यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर ही बाब एकदा बोलून दाखविली होती. त्यांचे काही मित्र त्यांच्यापासून अंतर ठेवून राहत होते. तसेच सुरेश गोपी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चित्रपटाविरोधातही प्रचार करण्यात आला होता, असेही नंबूथिरी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malayalam film director ramasimhan aboobakker alias ali akbar quits bjp party in kerala kvg
Show comments