मालेगाव : जिल्हा बँकेच्या सात कोटी, ४६ लाखाच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणे म्हणून ओळख असलेल्या मालेगावच्या हिरे घराण्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. कुळ कायद्याचे जनक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे पणतू असलेल्या अद्वय यांची आजवरील राजकीय वाटचाल तशी वादग्रस्त राहिली आहे. हिरे यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यांना राजकीय पदर नक्कीच आहे. त्यांचे कट्टर विरोधक नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे दबावतंत्र त्यास कारणीभूत असल्यासंदर्भात होणाऱ्या आरोपात तथ्य नसेलच, असे म्हणणेही अवघड आहे. असे असले तरी हिरेंविरुध्द दाखल असणाऱ्या गुन्ह्यांमधील तक्रारींचे गांभिर्यदेखील दुर्लक्षित करण्याजोगे दिसत नाही.
मालेगावजवळील द्याने गावात रेणुका देवी सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी २०१२-१३ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन टप्प्यात एकूण सात कोटी ४६ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. कर्ज परतफेड न झाल्याने थकबाकीची रक्कम ३१ कोटींवर पोहोचली. मग थकबाकी वसुलीसाठी बँकेने सूतगिरणीची मालमत्ता जप्ती व लिलाव प्रक्रिया सुरू केली. तेव्हा पहिल्या टप्प्यात दोन कोटी, ८० लाखाचे जे कर्ज घेण्यात आले होते, त्यासाठी एक कोटी, ५१ लाखाचीच मालमत्ता बँकेकडे तारण देण्यात आली होती. तसेच तीच मालमत्ता नंतर घेण्यात आलेल्या दोन कोटी, २० लाख आणि दोन कोटी, ४६ लाख या नंतरच्या दोन्ही टप्प्यांमध्ये घेतलेल्या कर्ज प्रकरणात तारण दिली गेली होती, हे निदर्शनास आले. तसेच प्रकल्प अहवालानुसार बांधकाम, यंत्रसामग्री नसल्याचे आणि कर्जाची ही रक्कम व्यंकटेश सहकारी बँकेत वळती केल्याचेही आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचा ठपका ठेवून बँकेने मालेगावमधील रमजानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही सूतगिरणी आणि व्यंकटेश बँक या दोन्ही संस्था हिरे कुटुंबियांशी संबंधित आहेत.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघात जनसंपर्कासाठी अमृता फडणवीस यांची साथ
या कर्जाचे जेव्हा वाटप झाले, त्यावेळी अद्वय हिरे हे जिल्हा बँकेचेही अध्यक्ष होते. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत हिरे, स्मिता हिरे, अपूर्व हिरे, अद्वय हिरे अशा २७ जणांविरुद्ध मार्च महिन्यात गुन्हा दाखल केला. अन्य सर्वांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र अद्वय यांना उच्च न्यायालयात जाऊनही अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही. सहा नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बुधवारी भोपाळच्या एका हॉटेलमधून पोलिसांनी अद्वय यांना ताब्यात घेतले. या अटकेमुळे हिरे कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा : माढाच्या उमेदवारीवरून भाजप अंतर्गत संघर्ष मोहिते-पाटील यांचाही दावा
अद्वय हिरे यांची आजवरची राजकीय कार्यशैली नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. सतत पक्षांतर करणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. नाशिक जिल्हा बँकेत तत्कालीन अध्यक्ष परवेज कोकणी यांची मनमानी वाढल्याच्या कारणावरून सत्ताधारी गटाने २०१२ मध्ये विरोधी गटातील अद्वय यांना अध्यक्षपदी बसविले होते. अद्वय यांची मनमानी कोकणी यांच्यापेक्षा अधिक असल्याचा साक्षात्कार झाल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांना आली होती. राष्ट्रवादीमध्ये असताना पक्षांतर्गत स्पर्धेतून नाशिकचे बडे नेते छगन भुजबळ हे माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या विरोधासाठी शिवसेनेच्या दादा भुसे यांना छुपे बळ देतात, असा आरोप केला जात असे. त्यावेळी अद्वय हे भुजबळ यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत असत. इतकेच नव्हे तर, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हक्काचा मालेगाव बाह्य मतदार संघ सोडून अद्वय यांनी शेजारच्या नांदगाव मतदार संघात भाजपकडून पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध उमेदवारी केली होती. तत्पूर्वी धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी ते आग्रही होते. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेल्या अद्वय यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते, त्याचीदेखील बरेच दिवस चर्चा होती. भाजपचे तत्कालीन महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्याशी झालेले त्यांचे भांडण विकोपाला गेले होते. भुसे यांचे पुत्र आविष्कार यांच्याशी झालेले आणि नंतर पोलिसात गेलेले त्यांचे भांडणही बरेच गाजले होते.
हेही वाचा : मोफत स्कुटी, अँटी-रोमियो स्क्वॉड, पोलिस दलात ३३ टक्के आरक्षण; भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
महत्त्व वाढले, पण…
ठाकरे गटात दाखल होण्यापूर्वी अद्वय हिरे हे भाजपमध्ये होते. शिवसेनेच्या फुटीनंतर दादा भुसे हे शिंदे गटात गेले. त्यावेळी भुसेंना पर्याय म्हणून जानेवारी महिन्यात ठाकरे गटाने अद्वय यांना आपल्या गटात घेतले. मार्च महिन्यात मालेगाव येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशाल सभा झाली. त्यामुळे अद्वय यांचे शिवसेनेतील महत्त्व वाढले. त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचे उपनेते हे पदही बहाल केले गेले. त्यानंतर हिरे परिवाराशी संबंधीत शिक्षण संस्थांविरुद्ध चौकश्या व तक्रारी दाखल होण्याचा ससेमिरा सुरू झाला. सहा महिन्यात हिरे कुटुंबाविरुध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. हिरे हे ठाकरे गटात गेल्यावरच गुन्हे दाखल होण्याची मालिका कशी सुरु झाली, हा प्रश्न त्यामुळेच विचारला जात आहे.