नवी दिल्ली : देशातील निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांऐवजी मतपेट्यांच्या वापरासंदर्भातील याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असली तरी, मतदानयंत्रांविरोधी आंदोलनाची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांकडून मतदानयंत्रांच्या वापराविरोधात देशव्यापी मोहीम सुरू केली जाणार असून तसे स्पष्ट संकेत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तालकटोरा स्टेडियमधील ‘संविधान बचाओ’ कार्यक्रमात दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच मतदानयंत्रांच्या वापराविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. मतदानयंत्र नव्हे तर, मतदानपेटीद्वारेच मतदान झाले पाहिजे, असे खरगेंनी स्पष्ट केले. खरगे यांनी भाषणामध्ये मतदानयंत्रांची गुणवत्ता वा दोषांवर भाष्य केले नसले तरी, ‘ही मतदानयंत्रे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या गोदामात ठेवावीत. आम्हाला मतदानयंत्रे नकोत. मतदानयंत्रांविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेसारखी मोहीम राबवली जाईल, असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >>>Maharashtra Vidhan Sabha Election Result: “महाराष्ट्र निवडणूक निकालात ४ बाबींचं आश्चर्य…”, योगेंद्र यादव यांनी केलं विश्लेषण!

सध्या मतदानयंत्रांद्वारे होणाऱ्या मतदान व्यवस्थेत अनुसूचित जाती, जमातींची मते वाया जात आहेत. ही मतदानयंत्रे आम्हाला नकोत. आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करू. आम्हाला कागदी मतपत्रिका द्या म्हणजे तुम्ही (भाजप) कुठे उभे आहात आणि तुमची स्थिती काय आहे, हे तुम्हाला कळेल, असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >>>विरोधक मुक्त मतदारसंघाला मुख्यमत्र्यांचे प्राधान्य

मतदानयंत्रविरोधी मोहिमेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली जाईल, असेही खरगेंनी स्पष्ट केले. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्येही या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना-ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट यांनीही मतदानयंत्रांच्या वापराविरोधात भूमिका घेतली आहे. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन सविस्तर चर्चा करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge against voting machines demanded a protest print politics news amy