काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘इंडिया’तील नेत्यांच्या शनिवारी झालेल्या आभासी बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात खरगे हेच विरोधकांचे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील! ‘इंडिया’ने मोदींविरोधात दलित नेतृत्व उभे करून भाजपच्या ओबीसी राजकारणालाही शह दिल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यामध्ये दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी महाआघाडीच्या अध्यक्षपदासाठी खरगेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर काँग्रेसने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे खरगेंना काँग्रेस अंतर्गत विरोध असल्याचा प्रचार भाजपने केला होता. आता खरगेंच्या नियुक्तीमुळे भाजपच्या या अपप्रचारालाही खीळ बसली आहे. खरगे यांच्याकडे ‘इंडिया’चे अध्यक्षपद दिले जाऊ शकते व त्यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणूनही मोदींविरोधात उभे केले जाऊ शकते, या दोन्ही मुद्द्यांवर काँग्रेस अंतर्गत आधीच चर्चा झालेली होती. खरगेंच्या नावाला सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे खरगेंच्या नावाबाबत काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मतभेद नव्हते. ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये सहमतीने खरगेंची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे हा कथित वाद संपुष्टात आला आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये जागावाटपावरून वाद; चर्चा करण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार!

खरगेंचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, ज्येष्ठता आणि परिपक्वता हे तीनही घटक ‘इंडिया’ महाआघाडीतील समरसता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. ‘इंडिया’च्या घटक पक्षांतील नेत्यांच्या आत्तापर्यंत चार बैठका झाल्या असल्या तरी, त्यांच्यातील ऐक्यापेक्षा मतभेदांवर अधिक चर्चा झाली होती. खरगेंच्या नियुक्तीमुळे ‘इंडिया’तील नेत्यांना एकमेकांशी समन्वय साधणे अधिक सुकर होऊ शकेल. काँग्रेस व अन्य घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यामुळे संतापलेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव अजूनही काँग्रेसला माफ करायला तयार नाहीत. लोकसभेसाठी उत्तर प्रदेशमधील जागावाटपाची दुसरी बैठक रद्द करावी लागली होती. आता उत्तर प्रदेशह अन्य राज्यांतील जागावाटपांचा तिढा खरगेंच्या मध्यस्थीतून सोडवला जाऊ शकतो, अशी आशा घटक पक्षांनाही वाटू लागली आहे.

‘इंडिया’च्या आभासी बैठकीमध्ये जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘इंडिया’च्या अध्यक्षपदी खरगेंच्या नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला. महाआघाडीचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच असले पाहिजे अशी आग्रही मागणी नितीशकुमार यांनी केल्याचे समजते. खरगेंच्या नावावर आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नसल्याने अपेक्षेप्रमाणे खरगेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या नियुक्तीमुळे ‘इंडिया’चे पंतप्रधानपदाचे संयुक्त उमेदवारही खरगे असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा – मुंबई महानगरात महायुतीचा ‘राम-सेतू’ पॅटर्न

दलित समाजातून आलेले खरगे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करून राजकीय क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’च्या धोरणांविरोधात भाजप आक्रमक प्रचार करू शकेल मात्र भाजपच्यां नेत्यांना वा मोदींना थेट खरगेंवर वैयक्तिक टीका करता येणार नाही. राहुल गांधी वा अन्य काँग्रेस नेत्यांवर मोदी वारंवार उपहासात्मक टिप्पणी करत असले तरी खरगेंवर हा ‘प्रयोग’ राजकीयदृष्ट्या अवसानघातकी ठरू शकेल. लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर टीका न करता येणे ही भाजपसाठी मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे.

‘इंडिया’च्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांना समन्वयक नेमण्यासंदर्भात चर्चा झाली असली तरी घटक पक्षांमध्ये सहमती झाल्याशिवाय त्यांची नियुक्ती केली जाणार नाही. नितीशकुमार यांनी एकमत झाले तरच हे पद स्वीकारू असे स्पष्ट केले आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव उपस्थित नव्हते. या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge appointment as president of india alliance is a headache for bjp print politics news ssb
First published on: 13-01-2024 at 16:29 IST