आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच सध्या राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आधार घेत भाजपाकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली आहे. दरम्यान, याच यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाने राजकारणात धर्म आणला आहे, असे खरगे म्हणाले.
राहुल गांधी करणार ६,७१३ किमी प्रवास
रविवारी (१४ जानेवारी) काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली. ही यात्रा साधारण दोन महिने चालणार असून, तिची सांगता महाराष्ट्रात होणार आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान बसद्वारे एकूण ६,७१३ किमीचा प्रवास करणार आहेत. इम्फाळ ते मुंबई, असा या यात्रेचा मार्ग आहे आणि ती एकूण १५ राज्यांतून आणि १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास करेल. २० किंवा २१ मार्च रोजी ही यात्रा मुंबईत पोहोचणार आहे.
खरगेंची मोदींवर सडकून टीका
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेला अधिकृत सुरुवात होण्याआधी काँग्रेसची इम्फाळच्या जवळ थौबाल येथे एक सभा झाली. या सभेत खरगे यांनी जोरदार भाषण करीत भाजपाला लक्ष्य केले. राहुल गांधी यांनीदेखील भाषण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी हे प्रभू रामाचा राजकारणासाठी वापर करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. “नरेंद्र मोदी हे समुद्रावरून सफर करतात आणि राम नावाचा जप करतात. त्यांचे वर्तन ‘मुख में राम, बगल में छुरी’ असे आहे, त्यांनी लोकांसोबत असे वागू नये,” असे खरगे म्हणाले.
“भाजपाने राजकारणात धर्म आणला”
“देव प्रत्येकाच्याच स्मरणात आहे. प्रत्येकाचीच देवावर श्रद्धा आहे. याबाबत कसलीही शंका नाही. मात्र, मतांसाठी लोकांची अशी फसवणूक करू नये. तत्त्वांसाठी लढा द्यायला हवा. आम्हीदेखील आमच्या तत्त्वांसाठीच लढत आहोत. आम्ही सर्वधर्मसमभाव, स्वातंत्र्य, समानता, सामाजिक न्याय यासाठी लढत आहोत. आम्ही संविधानाला वाचवत आहोत. या देशातील जनतेनेदेखील या तत्त्वांसाठी लढायला हवे. भाजपाने राजकारणात धर्म आणला आहे,” असेही खरगे म्हणाले.
राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस उपस्थित राहणार नाही : काँग्रेस
दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, तसेच काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. काँग्रेसने मात्र या कार्यक्रमाला वरील तिन्ही नेते उपस्थित राहणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.