सध्या मिझोरम, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस, भाजपा यांच्यासह इतर प्रादेशिक पक्ष या पाचही राज्यांत पूर्ण ताकदीने प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत आमचाच विजय होणार, असे सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, मध्य प्रदेशमध्ये सध्या सत्ताविरोधी लाट आहे. मध्य प्रदेशसह सर्व पाच राज्यांत काँग्रेसचीच सत्ता येणार, असा विश्वास व्यक्त केला. ते कर्नाटकमध्ये एएनआय या वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
“महागाई, बेरोजगारी यांमुळे लोक सध्या चिडलेले”
यावेळी बोलताना “पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची तयारी उत्तम आहे. या पाचही राज्यांत आमचा विजय होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. भाजपाच्या बाबतीत सध्या लोकांच्या मनात सत्ताविरोधी लाट आहे. महागाई, बेरोजगारी यांमुळे लोक सध्या चिडलेले आहेत,” असे खरगे म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये लोक शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारविरोधात आहेत, असेही खरगे म्हणाले.
भाजपा सरकार आश्वासन पूर्ण करू शकले नाही : खरगे
केंद्रातील भाजपा सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोपही खरगे यांनी केला. “भाजपाने अनेक आश्वासनं दिली होती; मात्र त्यातील एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. बेरोजगारी संपवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, देशात गुंतवणूक आणणे, अशा आश्वासनांचा त्यात समावेश होता,” असे खरगे म्हणाले. खरगे कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. येथे बोलताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेला केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. केंद्राचे कोणतेही प्रकल्प कर्नाटकला दिले जात नाहीयेत, असा आरोपही त्यांनी केला.
कोणत्या राज्यात किती मतदान?
दरम्यान, छत्तीसगडमध्ये ७ व १७ नोव्हेंबर रोजी, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर व तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतदान मोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
२०१८ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?
मध्य प्रदेशमध्ये एकूण २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाला १०९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४१.५ टक्के; तर भाजपाला ४१.६ टक्के मते मिळाली होती. २०१८ साली काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मात्र, २०२० साली ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे येथे काँग्रेसचे सरकार कोसळले होते. सध्या येथे भाजपाची सत्ता असून, शिवराजसिंह चौहान सत्तेत आहेत.
राजस्थानमध्ये २०० जागांसाठी निवडणूक होत आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवीत बहुजन समाज पार्टी, तसेच अन्य अपक्ष आमदारांना सोबत घेत सरकार स्थापन केले होते. या निवडणुकीत काँग्रेसला ३९.८ टक्के मते मिळाली होती. भाजपाला येथे ७३ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाला ३९.३ टक्के मते मिळाली होती.
तेलंगणा, छत्तीसगडमध्ये काय स्थिती?
तेलंगणा राज्यात एकूण १९९ जागांवर निवडणूक होत आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत बीआरएस पक्षाला ४७.४ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला १९ जागा मिळाल्या होत्या; तर बीआरएस पक्षाने एकूण ८८ जागांवर विजय मिळवला होता. छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी निवडणूक होत आहे. २०१८ साली काँग्रेसने एकूण ६८ जागांवर विजय मिळवला होता. तसेच ४३.९ टक्के मते मिळवली होती. भाजपाला फक्त १५ जागांवर विजय मिळवता आला होता. या निवडणुकीत भाजपाला ३३.६ टक्के मते मिळाली होती. मिझोरम राज्यात ४० जागांसाठी निवडणूक होत आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने २६ जागा जिंकत ३७.८ टक्के मते मिळवली होती