एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाल्यानंतर त्याबद्दल सोलापुरात काँग्रेसजनांनी जल्लोष न करता थंडेपणाने स्वागत केले. काँग्रेस भवन परिसरात कोणताही उत्साह पाहायला मिळाला नाही. खरगे हे सोलापूरच्या शेजारीच कर्नाटकातील गुलबर्गा येथून वर्षानुवर्षे प्रतिनिधित्व करत असत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शेजारी म्हणून सोलापूरशी त्यांचा नेहमीच संबंध आला आहे. त्यांची अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणे ही घटना सोलापूरकरांच्या दृष्टीने समाधानकारक आहे. त्या अनुषंगाने शहर जिल्हा काँग्रेसकडून खरगे हे पक्षाध्यक्ष झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा होण्याची अपेक्षा होती. परंतु तसा कोणताही आनंदोत्सव किंवा जल्लोष झाला नाही. यासंदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर पक्षाचे शहर सरचिटणीस ॲड. मनीष गडदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही, आपण मुंबईत असल्यामुळे यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> गांधी घराण्याचा खरगेंनाच होता पाठींबा, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजातील असून  सोलापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेसुध्दा दलित समाजातूनच पुढे आले आहेत. या दोन्ही नेत्यांकडे काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून पाहिले जाते. तथापि, पक्षांतर्गत राजकारणात खरगे व शिंदे यांच्यात काहीसा बेबनाव दिसून येतो. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची वर्णी लागेल, अशी अटकळ सोलापूरच्या काँग्रेसजनांनी बांधली होती. परंतु आमदार प्रणिती शिंदे यांच्याऐवजी मुंबईच्या वर्षा गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. यात काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर राग काढत सोलापुरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. एवढेच नव्हे तर खरगे यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. त्यावरून पक्षात वादंग माजले होते. यात स्वतः सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तेव्हा झालेल्या चुकीबद्दल स्थानिक काँग्रेसजनांनी प्रदेशाध्यक्षांकडे माफीनामा पाठविला होता. या पार्श्वभूमीवर आज खरगे यांच्या पक्षाध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर सोलापुरात पक्षाच्या वर्तुळात दिसून आलेला थंडपणा हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjuna kharge election as congress president no more excitement in solapur print politics news ysh