‘वाझील कुझही उंडावूं’ या मल्याळी चित्रपटाच्या पोस्टर्समुळे केरळमध्ये सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ‘वाझील कुझही उंडावूं’ याचा अर्थ होतो ‘रस्त्यावर खड्डे असतील. पण कृपया या’. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या उपहासात्मक मल्याळम चित्रपटाच्या निमित्ताने राजकीय पक्ष एकमेकांवर करण्याची संधी साधत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर्सवरून पक्ष आणि त्यांचे समर्थक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर राज्यातील खड्डेमय रस्त्यांवरून हल्लाबोल करत आहेत. 

या चित्रपटात एका भुरट्या चोराची कथा दाखवण्यात आली आहे. चोर आणि पोलिस यांच्यातील कायदेशीर कसरतीची कथा हा चित्रपट सांगतो. चित्रपटात खड्ड्यांचा केवळ संदर्भ आहे. मात्र या चित्रपटाचे लावण्यात आलेले पोस्टर्स हे राज्यातील सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडी सरकारच्या समर्थकांवर टीका करण्यासाठी लावण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीपीआय(एम) चे प्रेम कुमार हे टेलिव्हिजनवरील वादविवादांबाबत म्हणाले की “जे कठोर परिश्रम करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा अपमान करण्यासाठी एका खास अजेंडासह काम केले जात आहे. या चित्रपटाची अश्याप्रकारे जाहिरात करून या चित्रपटाच्या वितरकांनी ते लोकविरोधी आघाडीचा भाग असल्याचे दाखवून दिले आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारविरुद्ध ही मोहीम आहे. हा चित्रपट पाहण्याबाबत मी माझा विचार बदलला आहे.”

येथील डाव्या पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर हा चित्रपट मी पाहणार नाही अशी मोहीम राबवली आहे. रेस्मिथा रामचंद्रन यांच्यासह काही प्रमुख डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडियावर या विरोधात आवाज उठवला आहे. यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे पोस्टर शेअर केले आणि सोबत एक संदेश लिहिला आहे. या संदेशात ते म्हणतात “मला हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती. पण आता मी माझा निर्णय बदलला आहे. ही जाहिरात मागे घेतल्यानंतर आणि प्रभारींनी माफी मागितल्यानंतरच मी हा चित्रपट पाहीन.”

काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते व्ही.डी साठेसन यांनी पोस्टरच्या माध्यमातून डावे पक्ष विरोधकांवर करत असलेल्या टिकेबाबत  प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करणारे चित्रपटाच्या पोस्टरच्या विरोधात उतरले आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्या कुणालाही ते सोडणार नाहीत, हे यावरून दिसून येते. जर पोस्टर केरळच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल बोलत असेल तर ते चित्रपट निर्मात्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पाहिले पाहिजे”. 

चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर फेसबुकवर प्रतिक्रिया देताना मल्याळम कादंबरीकार बेन्यामीन म्हणाले, “तुम्हाला एखाद्या चित्रपटाच्या जाहिरातीची भीती वाटत असेल, तर तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुमच्यात काहीतरी गंभीर चूक आहे. चित्रपट पाहण्यासाठी मी चित्रपटगृहात जाण्याचा निर्णय घेतला आहे.’’

Story img Loader