पश्चिम बंगाल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने बाजी मारली. या निवडणुकीतील हिंसाचारात अनेक सामान्य नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे निवडणुकीतील विजयामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजयामुळे तृणमूल काँग्रेसचे विरोधी गटातील वजन वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी विरोधकांच्या १७-१८ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार
२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी जून महिन्यात पाटणा येथे विरोधातील सर्व पक्षांची पहिली बैठक पार पडली. त्यानंतर आता
येत्या १७-१८ जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधातील सर्वच पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी हेदेखील या बैठकीला हजेरी लावणार आहेत. हे दोन्ही नेते १७ जुलै रोजी कर्नाटकमध्ये पोहोचतील. १७ जुलै रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या बैठकीला येणाऱ्या सर्व नेत्यांसाठी रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मात्र या जेवणाला ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. ममता बॅनर्जी वैद्यकीय कारणामुळे या जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही नेते दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सीपीआय (एम) आणि काँग्रेसची तृणमूलवर टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंसाचार झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील सीपीआय (एम) आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीची हत्या केली, असा आरोप या नेत्यांनी केला. हाच मुद्दा घेऊन तृणमूल काँग्रेसचे नेते विरोधकांच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या बैठकीत अभिषेक बॅनर्जी नाराजी व्यक्त करू शकतात
याबाबत तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला पराभूत करण्याचा आमचा उद्देश स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही विरोधकांच्या ऐक्याबाबत ठाम आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी घेतलेल्या भूमिकांमुळे अभिषेक बॅनर्जी आपली नाराजी व्यक्त करू शकतात, असे या नेत्याने सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे तृणमूल-काँग्रेस आमनेसामने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हिंसाचारावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. थेट तृणमूल काँग्रेसवर टीका न करता ते निष्पक्षपणे निवडणुका पार पडायला हव्यात. नाहीतर देशातील लोकशाही जिंकणार नाही, असे मत व्यक्त केले होते. काँग्रेसच्या या विधानावर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला काँग्रेस आणि सीपीआय (एम) या पक्षांची दया येते. सध्या राष्ट्रीय पातळीवर आम्ही ऐक्यासाठी प्रयत्न करत आहोत, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली होती. त्यांचा रोख पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांच्यावर होता. अधीर चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ममता बॅनर्जी या ढोंगी आहेत. ममता बॅनर्जी यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांच्या रक्ताशी खेळ केला. आता त्या राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याची भाषा बोलत आहेत. हा दुटप्पीपणा स्विकारार्ह नाही, असे अधीर चौधरी म्हणाले होते.
सुवेंदू अधिकारी यांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका
दरम्यान, विरोधकांच्या ऐक्यावर आणि बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीवर पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी टीका केली आहे. ममता बॅनर्जी या राज्यात काँग्रेस आणि सीपीआय (एम) पक्षांवर टीका करतात. मात्र पाटणा येथे सीपीआय (एम) पक्षाच्या सीताराम येच्युरी यांच्यासोबत चहा घेतात. राहुल गांधी ममता बॅनर्जी यांना सन्मान देत नाहीत. तरीदेखील त्या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी टीका अधिकारी यांनी केली.