गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील घटकपक्षांतील मतभेद तीव्र झाले आहेत. जागावाटपाच्या प्रमुख मुद्द्यांवरून या आघाडीतील काही घटकपक्षांत तोडगा निघत नाहीये. याच कारणामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. त्या आता काँग्रेसवर उघड-उघड टीका करत आहेत. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यांनी या यात्रेवरूनही काँग्रेसला लक्ष्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४० जागांवरही निवडून येऊ शकणार नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तृणमूल काँग्रेस हा पक्ष अद्याप इंडिया आघाडीचाच एक भाग आहे.
ममता बॅनर्जींची काँग्रेसवर टीका
शुक्रवारी (२ फेब्रुवारी) बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाचे धोरण, भारत जोडो न्याय यात्रा यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही यात्रा दुसरे तिसरे काही नसून फोटो शूटचा कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने भाजपाशासित राज्यांत जाऊन अशा प्रकारची यात्रा काढावी, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“काँग्रेसने ३०० जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता”
पश्चिम बंगालला निधी दिला जात नसल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी बोलताना “काँग्रेसने देशात एकूण ३०० जागा लढवाव्यात आणि उर्वरित जागा या इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी सोडाव्यात, असा प्रस्ताव मी मांडला होता. मात्र, त्यांनी माझे ऐकले नाही. आता ते पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे; तर भाजपाकडून हिंदू मतांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाने काय करावं? त्यांनी ३०० जागांवर निवडणूक लढवल्यास ते ४० जागांवरही निवडून येतील की नाही? असा प्रश्न आहे,” अशी टीका ममता बॅनर्जींनी केली.
दोन जागा देण्याची तयारी दाखवली होती- ममता बॅनर्जी
“पश्चिम बंगालमध्ये मी त्यांना दोन जागा देण्याची तयारी दाखवली होती. तसेच या जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय व्हावा म्हणून आम्ही प्रचारही करणार होतो. मात्र, त्यांना आणखी जागा हव्या आहेत. मी त्यालाही सहमती दर्शवत तुम्हीच सर्व ४२ जागा लढवा असे म्हणाले होते, तरीदेखील त्यांनी माझा प्रस्ताव फेटाळला. तेव्हापासून आमच्यात जागावाटपावर कोणतेही संभाषण नाही,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भारत जोडो यात्रेबद्दल काहीही सांगितले नाही- ममता बॅनर्जी
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पश्चिम बंगालमधील नियोजनाबद्दल मला काहीही सांगितलेलं नाही, असे ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. “भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये येत आहे. मात्र, इंडिया आघाडीचा घटकपक्ष या नात्याने त्यांनी मला या यात्रेबाबत काहीही सांगितलेले नाही. मला पश्चिम बंगालमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या यात्रेबद्दल माहिती मिळाली,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
काँग्रेसची ही यात्रा म्हणजे फोटो शूटचा कार्यक्रम – ममता बॅनर्जी
कोणाचेही प्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी काँग्रेसची ही यात्रा म्हणजे फोटो शूटचा कार्यक्रम आहे, अशी टीका केली. “जे कधीही चहाच्या स्टॉलवर बसलेले नाहीत किंवा लहान मुलांसोबत खेळलेले नाहीत, त्यांचे फोटो काढले जात आहेत. विडी कशी बांधतात हे माहीत नसलेले विडी कामगारांशी चर्चा करत आहेत,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल- राहुल गांधी
याआधी राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेस आणि या पक्षाचा इंडिया आघाडीतील सहभाग यावर शुक्रवारी मुर्शिदाबाद येथे प्रतिक्रिया दिली. “तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीचा एक भाग आहे. ममता बॅनर्जी किंवा काँग्रेस अशा कोणीही ही आघाडी संपुष्टात आलेली आहे, असे सांगितलेले नाही. ममता बॅनर्जी अजूनही त्या आघाडीत असल्याचे सांगत आहेत, आमचेही तेच मत आहे. जागावाटपावर चर्चा सुरू आहे, लवकरच तोडगा निघेल,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार- ममता बॅनर्जी
दरम्यान, २४ जानेवारी रोजी ममता बॅनर्जी यांनी आम्ही लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहोत, असे जाहीर केले होते. तसेच निवडणुकीनंतर आघाडी करायची की नाही ते ठरवले जाईल, असेही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले होते. या घोषणेमुळे काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली होती.