राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या बिहारमध्ये असून काही दिवसांतच पुन्हा पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस आणि सीपीआय भाजपाला मदत करत असून मोदी आणि शहा विरोधात केवळ तृणमूल काँग्रेस लढा देत असल्याचे त्या म्हणाल्या.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावरून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात टीका-टिप्पणी सुरू आहे. अशातच ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमध्ये दाखल होताच, पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – इंडिया आघाडीला दुसरा धक्का, जागावाटपावर चर्चा चालू असताना समाजवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

दरम्यान, बुधवारी मालदा येथे तृणमूल काँग्रेसची जाहीर सभा पार पडली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि सीपीआय दोघे मिळून भाजपासाठी पोषक वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि सीपीआय दोघे मिळून भाजपासाठी पोषक वातावरण निर्मिती करत आहेत, तर भाजपा विरोधात केवळ आमचा लढा सुरू आहे. आम्ही पश्चिम बंगालच्या जनतेसाठी बरेच काम केले आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे केवळ दोन खासदार आहेत. त्यांनी पाच वर्षात कोणतेही काम केले नाही. मात्र, आम्ही मालदाच्या जनतेसाठी बरेच काम केले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच निवडणूक आली की काही पक्षी अचानक गाऊ लागतात, काही पक्षी इथेही येतात, असा टोलाही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. अशा स्थितीत मी काँग्रेसला दोन जागांचा प्रस्तावर दिला होता. मात्र, त्यांनी तो मान्य केला नाही. त्यांनी माझ्याकडे आणखीन जागांची मागणी केली. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आधी तुम्ही सीपीआयची साथ सोडा, मग इतर जागांबाबत विचार करू; कारण सीपीआय सत्तेत असताना त्यांनी मला मारहाण केली होती. त्यांनी बंगालमधील लोकांनाही प्रचंड त्रास दिला, हे मी विसरू शकत नाही. बंगालची जनताही हे कधी विसरणार नाही.

हेही वाचा – तमिळ स्टार ‘थलापथी’ विजयची राजकारणात एंट्री; विजयच्या राजकारणातील प्रवेशामागे कारण काय?

दरम्यान, राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमध्ये दाखल होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच युतीबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ, असेही त्यांनी सांगितले होते. तसेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती न होण्यास टीएमसी नेत्यांनी पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना जबाबदार धरले होते. तर काँग्रेसने याबाबत प्रतिक्रिया देताना आमच्या बाजूने चर्चेची दारं खुली असल्याचे म्हटले होते.

Story img Loader