पश्चिम बंगालमधील भाजपा, सीपीआय (एम) आणि काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुर्शिदाबाद दंगलीनंतर तिथे भेट दिली. मात्र, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अद्याप या जिल्ह्याला भेट दिलेली नाही. राज्यातील विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्रिपद ममता बॅनर्जींकडे असतानाही त्यांनी दंगलीनंतर कित्येक दिवस उलटूनही येथे भेट दिलेली नाही. वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान ११ एप्रिलला या जिल्ह्यात जातीय हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर मंगळवारी ममता यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराग्रस्त भागाला भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराला बाहेरचे लोक जबाबदार असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. “हिंसाचार दुर्दैवी होता. आम्हाला दंगली नको आहेत. काही बाहेरचे लोक हे घडवून आणत आहेत. पण आम्ही त्यांचा आणि त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश करू”, असं ममता यांनी म्हटलं आहे. मंगळवारी मेदिनीपूर जिल्ह्यातील सालबोनी येथे जेएसडब्ल्यूच्या १६ हजार कोटींच्या एक हजार ६०० मेगावॅट औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री या महिन्याच्या अखेरीस पूर्व मेदिनीपूरमधील दिघा येथे जगन्नाथ मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. पश्चिम बंगाल गृहनिर्माण पायाभूत सुविधा विकास महामंडळाने पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या प्रतिकृतीस्वरूप हे मंदिर बांधले आहे. सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार यांनी मुर्शिदाबादच्या धुलियान व समसेरगंज या दंगलग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या मोठ्या घटनेनंतर अद्याप जिल्ह्याला भेट न दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. “हिंदूंची दुर्दशा पाहण्यासाठी त्या आधी इथे असायला हव्या होत्या. त्यामुळे लोकांना आत्मविश्वास मिळाला असता. त्या फक्त मुर्शिदाबादमधील मुस्लिमांच्या मुख्यमंत्री आहेत का? त्या पूर्ण राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. हिंदूंना इथे राहण्यासाठी आत्मविश्वासच नाही. मुख्यमंत्र्यांनी इथल्या हिंदूंना भेटणं महत्त्वाचं होतं. त्यांनी इथे भेट दिली पाहिजे होती”, असे मुजुमदार यांनी म्हटले.
विरोधकांची ममतांवर टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बहरामपूरचे माजी खासदार अधीर रंजन चौधी यांनी म्हटले, “जर राज्याचे पोलीस महासंचालक मुर्शिदाबादला येऊ शकतात; तर मुख्यमंत्री का नाही? हिंसाचार पसरत असताना त्यांनी तत्काळ येथे यायला हवं होतं. प्रत्यक्षात काय घडले, ते पाहण्यासाठी त्या हेलिकॉप्टरने येऊ शकतात.” “तृणमूल काँग्रेस आणि भाजपा दोघेही आरएसएसच्या विचारांनुसार काम करीत आहेत. ते लोकांमध्ये फूट पाडण्याचा धोकादायक खेळ खेळत आहेत”, असा आरोप सीपीआय (एम)चे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी केला आहे.
“स्वत:चे राजकीय मूल्यांकन केल्यानंतर, परिस्थिती नियंत्रणात आल्याची खात्री केल्यानंतर ममता संघर्षग्रस्त भागाला भेट देण्याचा निर्णय घेतात”, असं मत काही निरीक्षकांनी मांडलं आहे. उत्तर २४ परगणा येथेही अशीच घटना घडल्यानंतर ममता यांनी काही महिन्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये त्या भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी रहिवाशांना भूतकाळ विसरून प्रगती आणि विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन केले.
टीएमसीकडून स्पष्टीकरण
“११ एप्रिलच्या घटनेनंतर परिस्थिती ममतांच्या बाजूने नव्हती. पोलिसांच्या गोळीबारामुळे मुस्लिम संतप्त झाले होते आणि त्यांच्या भागात हिंसाचार झाल्यामुळे हिंदू संतप्त झाले. त्यामुळे अशांतता वाढण्याची शक्यता असताना दोन्ही बाजूंच्या कोणत्याही संभाव्य निषेधांना टाळण्यासाठी ममतांनी आतापर्यंत जिल्ह्याला भेट देणे टाळले, असे टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. हिंसाचारात जाफराबाद येथे जमावाने चंदन दा आणि त्यांचे वडील हरोगोबिंदो दास यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देऊ केली. मात्र, त्यांनी ही मदत स्वीकारण्यास नकार दिला. ११ एप्रिलला झालेल्या या हिंसाचारदरम्यान एजाज अहमद हा मृत्यू झालेल्यांपैकी तिसरा माणूस होता. तो पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता. धुलियान आणि समसेरगंज भागातील अनेक स्थानिकांनी तिथे कायमस्वरूपी बीएएसएफ कॅम्पची मागणी केली होती. कारण- त्यांना राज्य पोलिसांवर विश्वास नाही”, असा आरोप राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी केला होता.
मुर्शिदाबाद आणि मालदा येथील दोन दिवसांच्या भेटीदरम्यान आनंद बोस यांनी वारंवार प्रभावित लोकांशी संवाद साधला. तसेच तोडफोड आणि जाळपोळ झालेल्या घरांची पाहणी केली. जाफराबादमधील मृत पिता-पुत्राच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली. “केंद्रीय सैन्य तैनात झाल्यापासून परिस्थिती नियंत्रणात आहे. जे घडले ते क्रूरच आहे. असे पन्हा घडू नये”, असं राज्यपाल बहरामपूर येथे म्हणाले. हिंसाचारग्रस्त भागांना आता भेट देऊ नका, अशी मुख्यमंत्र्यांची विनंती नाकारल्यानंतर आनंद बोस यांनी मुर्शिदाबाद दौरा सुरू केला. तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यासाठी पक्षाने मुर्शिदाबादमधील आमदार आणि खासदारांसह त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्रित आणले आहे. शांतता बैठका घेण्यापासून ते हिंसाचारग्रस्त भागांना भेट देण्यापर्यंतच्या या दौऱ्याचे नेतृत्व टीएमसीचे आमदार अमीर इस्लाम, मनीरूल इस्लाम आणि खासदार खलीलुर रहमान हे करीत आहेत. टीएमसीचे राज्यसभा खासदार समीरूल इस्लामदेखील या भागात उपस्थित आहेत.