पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. हावडा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीला जाण्यापूर्वी मेदिनीपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. युतीबाबत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी चर्चा सुरू नसून आम्ही आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. आघाडीबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, ममता बॅनर्जींनी हा निर्णय नेमका का घेतला? याविषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राम मंदिरामुळे देशातील राजकारण बदलणार? विरोधकांपुढे आव्हान काय?

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

”युतीबाबत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाबरोबर आमची चर्चा सुरू नाही. यासंदर्भात आमचे कोणाशीही बोलणे झालेले नाही. त्यामुळे युतीच्या चर्चा या केवळ अफवा आहेत, यात कोणतेही तथ्य नाही, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या, ”आम्ही काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनी हा प्रस्ताव नाकारला; त्यामुळे आमच्या पक्षाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात आम्ही इंडिया आघाडीचा भाग आहोत. अशातच काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र, काँग्रेसने आम्हाला यात्रेत सहभागी व्हा, असे म्हटलेले नाही. पश्चिम बंगालबाबत बोलयायचं झाल्यास आमचे काँग्रेसबरोबर कोणतेही राजकीय संबंध नाहीत.

गेल्या वर्षांची निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेसपेक्षा मजबूत स्थितीत आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सातत्याने दारुण पराभावाचा सामना करावा लागला.

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १३.५ टक्के मतं मिळाली होती. ही संख्या २०१४ मध्ये ९.७ टक्क्यांपर्यंत तर २०१९ मध्ये ५.६ टक्क्यांपर्यंत खाली आली. जागांचा विचार केला, तर पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी २००९ मध्ये काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाल होता, ही संख्या २०१४ मध्ये ४ तर २०१९ मध्ये २ जागांपर्यंत खाली आली. या तुलनेत तृणमूल काँग्रेसला २००९ मध्ये ३१. २ टक्के मतं मिळाल होती. २०१४ मध्ये ती वाढून ३९.८ टक्क्यांपर्यंत तर २०१९ मध्ये ती ४३.३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.

भाजपा आणि डाव्या पक्षांचा विचार केला, तर २००९ मध्ये भाजपाला ६.१ टक्के मतं मिळाली होती. २०१९ मध्ये ही संख्या ४०.६ टक्क्यांवर पोहोचली. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला २००९ मध्ये ३३.१ टक्के मतं मिळाली होती. २०१९ मध्ये ती घसरून ६.३ टक्क्यांवर आली.

२०१४ पर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपा हा पक्ष केवळ एक-दोन जागांपर्यंतच मर्यादित होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपाने तृणमूल काँग्रेसला जोरदार झुंज दिली. या निवडणुकीत भाजपाने ४२ पैकी १८ जागांवर विचार मिळवला. तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला.

हेही वाचा – आसाम : भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत संघर्ष, प्रदेशाध्यक्ष बोराह जखमी!

युतीबाबत राहुल गांधींनी दिली होती प्रतिक्रिया :

मंगळवारी आसाममध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी युतीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. ”तृणमूल काँग्रेसबरोबर आमचे संबंध चांगल्या स्थितीत आहेत, थोड्या फार गोष्टी होत राहतात. त्यांचे नेते काही बोलताना, त्यावर आमच्या नेत्यांकडून उत्तर दिलं जातं. मात्र, असं असलं तरी याचा आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही”, असे ते म्हणाले होते.

महत्त्वाचे म्हणजे त्यापूर्वी २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबरोबर सीपीआयवरही टीका केली होती. त्या म्हणाल्या, ”आज भाजपाविरोधात रस्त्यावर उतरण्यास कोणताही नेता तयार नाही, आज काही नेते केवळ मंदिरात जात आहेत. मात्र, तेवढ्याने काही होणार नाही. मी एकटी आहे, जिने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी शोभायात्रा काढली. त्यापूर्वीही मंदिर, मशीद, चर्च अशा सर्वच ठिकाणी भेटी दिल्या.”

या बरोबरच इंडिया आघाडीसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, ”या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव मी दिले होते. पण, ज्यावेळी मी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले, त्यावेळी सीपीआय या बैठकीला नियंत्रित करत असल्याचे मला लक्षात आले. त्यांच्या विरोधात मी गेली ३४ वर्ष लढा देत आहे, हे आम्हाला कधीही मान्य होणार नाही.”

ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांवर सीपीआय नेते सीताराम येच्युरी यांनीही प्रतिक्रिया दिली. ”ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला अतिरेकी म्हटले होते, पण मुळात इंडिया आघाडीतील प्रत्येक निर्णय सर्वानुमते घेतला जातो; त्यामुळे या बैठकीला नियंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee said her part will contest upcomimg loksabha election of its own spb