उमाकांत देशपांडे
पक्षश्रेष्ठींसाठी उपयुक्त व विश्वास असलेला; मारवाडी, जैन, गुजराती समाजाचे प्रतिनिधित्व करणारा आणि देशातील बडा बांधकाम व्यावसायिक अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ भाजप नेते व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. लोढा कुटुंबीय मूळ जोधपूरचे, वडील स्वातंत्र्यसेनानी आणि जोधपूर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती व गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. वकिली व्यवसाय असलेल्या कुटुंबातील लोढा यांनी कायद्याची पदवी घेतली खरी, पण त्यांनी १९८१ मध्ये मुंबईत येऊन मँक्रोटेक बांधकाम कंपनी स्थापन करून या क्षेत्रात उडी घेतली आणि अल्पावधीतच भक्कम पाया रोवला. मुंबई, ठाण्यातील सर्वाधिक उंचीच्या ‘वर्ल्ड वन’सह अनेक उत्तुंग इमारती लोढा यांच्या बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातील यशाची साक्ष देतात. त्यांच्या इमारतींच्या परवानग्यांवरून काही वाद निर्माण झाले, पण ते निवळले.
अतिशय साधी राहणी असलेले लोढा हे मंत्रालय आणि अन्यत्र वावरतानाही बरोबर फारसा जामानिमा किंवा सहकाऱ्यांचा ताफा न घेता हिंडत असतात, अधिकाऱ्यांच्या व इतरांच्या भेटी घेताना दिसतात. लोढा यांनी बांधकाम क्षेत्राच्या बरोबरीने भाजपचे काम करून तेथेही जम बसविला. ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्याबरोबर त्यांनी काम केले. दक्षिण मुंबईतील मलबार हिल मतदार संघातून ते १९९५ पासून सहा वेळा सलग निवडून आले. त्यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी १७ जुलै २०१९ रोजी नियुक्ती झाली. ही जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली. करोना काळात मदतकार्य केले. मात्र फटकून वागल्याने मुंबईतील अनेक भाजप खासदार- आमदारांशी त्यांचे फारसे पटले नाही.
लोढा हे भाजपमध्ये अनेक वर्षे काम करीत होते, तरी ते बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. मात्र या मंत्रिमंडळात लोढा हे मुंबईचे एकमेव मंत्री ठरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या निकटच्या संबंध व विश्वासामुळे लोढा यांची मंत्रीपदी वर्णी लागली. राजस्थानी, मारवाडी व गुजराती समाज मुंबईत मोठ्या प्रमाणावर असून आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन लोढा यांचा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असताना त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार,याची चर्चा सुरू झाली आहे.