महिला व बाल कल्याण, पर्यटन, कौशल्यविकास ही खाती सांभाळणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा उत्साह आणि कामाचा उरक तसा दांडगाच. मंत्रिपद मिळताच अवघ्या दोन-अडीच वर्षांत भरीव कामगिरी करून दाखविण्याचे ठरविलेल्या लोढा यांची अतिउत्साह आणि घाईगडबडीमुळे काही वेळा चांगलीच पंचाईत झाली. हिंदुत्व, रुढीप्रियता व जुन्या विचारसरणीला अनुसरून निर्णय घेताना ते अडचणीत आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान दिले जात नाही आणि शासकीय व अन्य कामकाजात त्यांचा उल्लेख विधवा महिला असा न करता पूर्णांगी, स्वयंसिद्धा किंवा सक्षमा असा करण्याचे महिला आयोगाने सुचविले होते. पण काही महिला संघटनांनी ‘गंगा भागीरथी ‘ (गं. भा) असा उल्लेख करण्याबाबत पत्र दिले असून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश लोढा यांनी खात्याच्या सचिवांना दिले. त्यामुळे एकच गदारोळ झाला. पुरोगामी महाराष्ट्रात विधवा महिलांचा उल्लेख स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे गंगा भागीरथी असा करण्यास महिला संघटना, विचारवंत आणि राजकीय वर्तुळातूनही जोरदार विरोध झाला. सर्वसामान्यांनी लोढा यांच्यावर समाज माध्यमांवरून टीकेची झोड उठविली. त्यामुळे गंगा भागीरथी असा शब्द प्रयोग विधवा महिलांसाठी करण्याचा एका महिला संघटनेचा प्रस्ताव आहे, निर्णय झालेला नाही, असा खुलासा लोढा यांना घाईघाईने करावा लागला. या संस्थेचे नाव गुलदस्त्यात ठेवून त्यांचा प्रस्तावही आता थंड बस्त्यात ठेवला गेला आहे.

हेही वाचा – जमाखर्च : संदीपान भुमरे, स्वत:पुरतेच रमणारे मंत्री

लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत. महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या हजाराहून अधिक तक्रारी असल्याचे सांगून या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि आंतरधर्मीय विवाहांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा लोढा यांनी केली. मात्र त्यावरूनही गोंधळ सुरू झाल्याने ही समिती आंतरधर्मीय विवाहांच्या प्रकरणात मुलींना सर्वतोपरी मदत करेल, तिच्या कुटुंबियांशी संवाद ठेवेल, असा खुलासा करण्यात आला व हेल्पलाइन सुरू करण्याची घोषणा झाली. पण पुढे कार्यवाही झाली नाही.

राज्यात एक लाखांपेक्षा अधिक ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे असल्याचा उल्लेख लोढा यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करताच त्यावरून बराच गदारोळ झाला होता. विरोधकांनी पुरावे सादर करण्याची मागणी केल्याने लोढा यांची पंचाईत झाली होती. लोढा यांना मंत्री म्हणून टीका झेलण्याची सवय नसल्याने ते लगेच चिडतात व वाद वाढतो.

हेही वाचा – जमाखर्च : गुलाबराव पाटील; ‘पाणीवाले बाबां’च्या मतदारसंघातच पाण्याची टंचाई !

लोढा यांनी पर्यटन आणि कौशल्य विकास विभागात अनेक निर्णय घेतले. पर्यटन विभागाच्या अतिथीगृहांचे नूतनीकरण, सवलत योजना यासह काही उपक्रम राबवून पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न आहेत. राज्यात बेरोजगारीचा आणि तंत्रकुशल कामगारांना काम पुरविण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना लगेच कंपन्या व विविध उद्योगांमध्ये काम मिळेल, यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार संधी व उमेदवारांची नोंद केली जात आहे. लोढा यांनी मध्यंतरी जागोजागी रोजगार मेळावे आयोजित करून एवढ्या तरुणांना रोजगार दिला अशी जाहिरातबाजी केली होती. त्यावरूनही टीका झाली होती. पर्यटनमंत्री म्हणून विविध ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात सुधारणा, शिवसृष्टी यासारखे प्रकल्प राबविण्यावर त्यांचा भर असतो.

लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. मात्र या माध्यमातून लोढा यांना मोठी कामे व प्रकल्प मार्गी लावणे किंवा भरीव कामगिरी करणे, हे शक्य झालेले नाही. मंत्रिपदाची संधी मिळाल्याने पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळणे आणि फडणवीस यांचा विश्वास टिकवून ठेवणे, यावर लोढा यांचा अधिक भर असतो. भाजपचा हिंदुत्वाचा कार्यक्रम राबवून नेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खात्यांच्या निर्णयांमुळे नव्हे तर वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या लोढा यांना पुढील काळात वादग्रस्त वक्तव्ये आणि निर्णय घेऊन वाद निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangalprabhat lodha was in trouble while making decisions based on hinduism traditionalism and old thinking print politics news ssb
Show comments