पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु जाहीरनाम्याऐवजी भाजपने त्याचे स्वरूप ‘अंमलबजावणी आराखडा’ असे करण्याचे निश्चित केले आहे. पारंपरिक जाहीरनाम्याच्या पुढे जाऊन त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल, याचा दस्तावेज यानिमित्ताने तयार होत आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. विनय सहस्राबुद्धे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केंद्रात आणि राज्यात जाहीरनामा अंमलबजावणीच्या आघाडीवर यश मिळवले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने दिली जातात. मात्र सत्तेत पुन्हा येण्यासाठी संकल्पातून जाहीरनामा करण्याचा आणि त्याची अंमलबाजवणी करण्याचा आराखडा भाजपकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली आहे, असे सहस्राबुद्धे यांनी नमूद केले. ‘आराखड्यासाठी नागरिकांनी आणि मतदारांनी पक्षाकडे सूचना पाठवाव्यात, त्याचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल,’ असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा >>>Maharashtra Elections : ‘हरियाणापासून शिका,’ पाय जमिनीवर ठेवा; राहुल गांधींचा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना इशारा
नागरिकांनी सूचना पाठविण्यासाठी भाजपच्या संकेतस्थळावर स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. पत्राद्वारेही नागरिकांना सूचना पाठविता येतील. ‘विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींबरोबर प्रत्यक्ष चर्चा, ऑनलाइन पद्धतीने बैठका आणि वार्तालाप कार्यक्रम जाहीरनाम्याच्या अंमलबाजवणी आराखड्यात आयोजिले जातील,’ असे सहस्राबुद्धे यांनी सांगितले. या वेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.
जाहीरनामा समितीत कोण?
सुधीर मुनगंटीवार यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माधव भांडारी, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. भारती पवार, सुभाष देशमुख, माधवी नाईक, दिलीप कांबळे, धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरूळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, नरेंद्र पवार आदींचा समितीत समावेश आहे.
© The Indian Express (P) Ltd