मुंबई: राजकीय पक्षांची भविष्यातील भूमिका स्पष्ट करणारे जाहीरनामे महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी जाहीर केलेले असताना शिवसेना शिंदे गटाने जाहीरनाम्याला बगल दिली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्यापही जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही.
काँग्रेसने ६ एप्रिल रोजी सर्वात अगोदर जाहीरनामा जाहीर केला. त्यानंतर भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी १४ एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिध्द केला. राष्ट्रीय पक्षांनी जाहीरनामे प्रसिध्द केल्यानंतर काँग्रेस व भाजप वगळता राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने आठ पानी स्वतंत्र वचननामा प्रसिध्द केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटांनी स्वतंत्रपणे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. शिंदे गट वगळता राज्यातील प्रमुख पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. शिंदे गट १५ जागा लढत आहेत. एवढ्या जागा लढवूनही शिंदे गटाने राज्यातील जनतेला आश्वस्त करणारी आश्वासने प्रसिद्ध केलेली नाहीत.
आणखी वाचा-भाजपा हरियाणात एका मध्ययुगीन मुस्लीम राजाचा उदो-उदो का करत आहे?
अखेरच्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानाला चार दिवस शिल्लक असले तरी अजूनही जाहीरामाना प्रसिद्ध झालेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करणे हाच महायुतीचा जाहीरनामा आहे.. विकसित भारताप्रमाणे विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पक्षाचे मुख्य नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिले आहे. -डॉ. राजू वाघमारे, प्रवक्ते शिवसेना शिंदे गट