सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी आणि भाजपाच्या एकूणच धोरणांवर सडकून टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी उभ्या असलेल्या पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ आणि घोषणाबाजी करीत मणिपूरबाबत बोलण्यासाठी आग्रह धरला. मणिपूरमधील हिंसा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाने काहीही प्रयत्न केले नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत साधा ‘ब्र’ही का उच्चारत नाहीत, असा सवाल करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे. आज बुधवारी (३ जुलै) पंतप्रधान मोदी राज्यसभेमध्ये बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, विरोधक या मुद्द्यावरून राजकारण करीत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही घटक आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करीत आहेत. अशा घटकांना मणिपूरची जनता नक्कीच नाकारल्याशिवाय राहणार नाही.” पुढे पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलताना, “मणिपूरमध्ये आतापर्यंत ११ हजार एफआयआर नोंदविण्यात आले आहेत आणि ५०० लोकांना अटकही करण्यात आली आहे. “मागील अधिवेशनामध्येच मी मणिपूरबाबत सविस्तर बोललो होतो. मात्र, मी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतो. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, सरकार अथक प्रयत्न करीत आहे. तिथे ज्या काही घटना घडल्या. त्यानंतर ११ हजारहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मणिपूर हे लहान राज्य आहे. जवळपास ५०० लोकांना अटक करण्यात आली आहे”, असेही म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा