दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ५ मार्च रोजी प्रमुख विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी तसेच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. मात्र या पत्रापासून काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांनी दूर राहणेच पसंत केले. सोबतच बिहारमधील महत्त्वाचे नेते तसेच देशपातळीवर राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेदेखील या पत्रापासून दूरच राहिले. नितीशकुमार यांचा सहयोगी आरजेडी पक्षाच्या नेत्याचीही या पत्रावर सही असताना नितीशकुमार यांच्या या अलिप्ततावादी धोरणाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Karnataka Election : येडियुरप्पांच्या निष्ठावंतांवर निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी, शोभा करंदालजे कोण आहेत?

विरोधकांनी लिहिलेल्या पत्रावर नितीशकुमार यांची सही नाही

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा पराभव करायचा असेल तर विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी भावना जवळपास सर्वच पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांकडून विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले जात आहे. यामध्ये नितीशकुमार यांचेही नाव घेतले जाते. मात्र पत्राच्या माध्यमातून मोदी सरकारला धारेवर धरण्याची चांगली संधी असताना नितीशकुमार यांनी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नितीशकुमार यांनी पहिल्यांदाच अशी भूमिका घेतली आहे असे नाही. याआधीही त्यांनी अनेकदा सर्वांना चकित करणारे राजकीय निर्णय घेतलेले आहेत.

हेही वाचा >>> विरोधक एकत्र येऊ नयेत यासाठीच भाजपाने अफवा पसरवली; डीएमके-जेडीयूचा आरोप

विरोधकांचे ऐक्य सत्यात उतरेल असे वाटत नाही

नितीशकुमार यांनी २०१३ साली लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा २०१७ साली भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नितीशकुमार कधीही कोणतीही भूमिका घेऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. जेडीयूच्या वरिष्ठ नेत्याने नितीशकुमार यांच्या पत्रासंदर्भातल्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असे म्हटले जात आहे. मात्र हे ऐक्य सत्यात उतरेल असे आम्हाला वाटत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही भविष्यात किती काळ तग धरू शकतो, हे समजेल. म्हणूनच आम्ही सध्या द्विधा मन:स्थितीत आहोत,” असे या नेत्याने म्हटले आहे.

म्हणूनच ते स्पष्ट भूमिका घेणे टाळत आहेत

राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेत्यांनी नितीशकुमार यांच्या पत्रासंदर्भातील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. “विरोधकांची एकजूट जशी हवी आहे, तशी होणार नसल्याची बहुधा नितीशकुमार यांना कल्पना असावी. याच कारणामुळे ते स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळत आहेत. स्पष्ट भूमिका नसणारे राजकारण त्यांना मानवते,” अशी प्रतिक्रिया आरजेडीच्या नेत्याने दिली आहे.

हेही वाचा >>> अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या लोकसभेतील उमेदवारीला बळ

काँग्रेसच्या भूमिकेकडे नितीशकुमार यांचे लक्ष

दरम्यान, नितीशकुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते आगामी एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या राज्यांना भेट देणार आहेत. या काळात त्यांचे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. गैरभाजपा युतीसाठी काँग्रेस किती अनुकूल आहे, हे नितीशकुमार तपासतील. विरोधकांच्या ऐक्यासाठी कॉंग्रेस अनुकूल नसेल तर नितीशकुमार जपूनच पाऊल टाकतील, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish sisodia arrest opposition leaders letter nitish kumar not signed what is jdu upcoming plan for general election 2024 prd