Manmohan Singh and Narendra Modi Who is best : राजकीय विचारधारा व धोरणाच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्ववर्ती मनमोहन सिंग हे एकमेकांवर टीका करत होते. २०१४ ते २०२४ या कालावधीत दोन्ही नेत्यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु, यावर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भाषण करताना मनमोहन सिंग यांचे आभार मानले. इतकंच नाही तर त्यांचं कौतुकही केलं. एक खासदार म्हणून आपण कसे असायला हवे याचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, “लोकशाही मजबूत करण्यासाठी माजी पंतप्रधान हे व्हीलचेअरवर बसून सभागृहात आले आहेत.”
पंतप्रधान मोदींनी केली होती टीका
२०१४ मध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. ऑक्टोबर २०१२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी एका प्रचारसभेत सिंग यांना ‘मौन’ मोहन सिंग असं म्हटलं होतं. जवळपास वर्षभरानंतर मार्च २०१३ मध्ये, नवी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत बोलताना मोदींनी सिंग यांना‘नाइट वॉचमन’असं म्हटलं.
हेही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद पणाला लावून भारताला जागतिक नकाशावर कसं आणलं?
त्याच्या पुढच्या महिन्यात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, “मनमोहन सिंग यांना काँग्रेसमध्ये नेता म्हणून स्वीकारण्यात आलेलं नाही. काँग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांना तुमचा नेता कोण असा प्रश्न विचाराल तर त्यांच्यापैकी कोणीही मनमोहन सिंह यांचे नाव घेणार नाहीत. असा पंतप्रधान देशाचे नेतृत्व कसे करू शकतो? असा तिखट प्रश्नही मोदींनी उपस्थित केला होता.
राज्यसभेत मोदींनी केलं होतं कौतुक
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात बहुतमाने भाजपाचे सरकार आलं. त्यामुळे मनमोहन सिंग यांना पायउतार व्हावं लागलं. नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. फेब्रुवारी २०१७ मध्ये राज्यसभेत बोलताना मोदींनी मनमोहन सिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. तेव्हा काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. मोदी म्हणाले होते की, “त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही मनमोहन सिंग यांच्यावर एकही आरोप नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून शिकायला हवी.”
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेस खासदार चांगलेच संतापले होते. अनेकांनी सभागृहातून बाहेर पडणं पसंत केलं होतं. १० डिसेंबर २०१७ रोजी, गुजरात निवडणुकीच्या धामधुमीत मोदींनी काँग्रेसचे माजी खासदार मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवर भाष्य केलं होतं. या बैठकीला मनमोहन सिंग आणि माजी लष्करप्रमुख उपस्थित होते. “राज्यांमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी काँग्रेस थेट पाकिस्तानबरोबर हातमिळवणी करत आहे”, असा आरोप मोदींनी केला होता.
मनमोहन सिंग यांनी कसं दिलं उत्तर?
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या आरोपांना उत्तर देताना मनमोहन सिंग म्हणाले होते की, “एका हरलेल्या प्रकरणात राजकीय लाभ मिळविण्यासाठी पंतप्रधानांकडून खोट्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी दु:खी आणि व्यथित झालो आहेत. गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने शिवीगाळ आणि अपशब्दांचा केला जाणारा वापर यामध्ये पंतप्रधानांची निराशा स्पष्टपणे दिसून येते.” यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी संसदेत सांगितले होते की, “मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानबरोबर हातमिळवणी केली, असं सरकारला अजिबात वाटत नाही.”
हेही वाचा : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
४ जानेवारी २०१४ रोजी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग हे एका पत्रकार परिषदेत असं म्हणाले होते की, “मोदींच्या गुणवत्तेची चर्चा न करता, मला प्रामाणिकपणे असे वाटते की, नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान होणं देशासाठी विध्वंसक असेल.”
२०१४ मध्ये सत्ता गमावल्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी इंदूरमध्ये पत्रकारांनी मनमोहन सिंग यांना या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा सिंग म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आपत्ती ठरतील असं मी म्हणालो होतो. त्यावेळी मी एक कठोर शब्द वापरला होता. जो मला नको वापरायला पाहिजे होता. आता मला त्याची पुनरावृत्ती करायची नाही. पण ती वेळ दूर नाही जेव्हा मोदीजींनी राबविलेल्या सार्वजनिक धोरणाची परिणामकारकता परिणामकारकता किंवा अपयश ठरवण्याची संधी सर्वसामान्यांना मिळेल.”
पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये, संसदेत भाषण करताना नोटबंदीच्या निर्णयावरून त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं होतं. “नोटाबंदी म्हणजे देशाची संघटित लूट असून पंतप्रधानांनी यावर तत्काळ उपाय शोधायला हवा.” एका वर्षानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये सिंग यांनी अहमदाबाद येथील एका सभेत म्हणाले होते की, “नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देशाच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी धक्का देणारे निर्णय आहेत.”
मनमोहन सिंग यांनी एप्रिल २०१८ मध्ये इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांनी कठुआमधील ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या आणि उन्नावमधील भाजप आमदाराने किशोरवयीन मुलीवर केलेल्या कथित बलात्कारावर मोदींनी मौन बाळगल्यामुळे टीका केली होती. “मोदींनी मला दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे आणि अधिक वेळा बोलावे”, असा टोला सिंग यांनी लगावला होता.
“नरेंद्र मोदी यांचे सरकार घातक ठरतंय”
भाजपाने मनमोहन सिंग यांच्यावर अनेकदा ‘मौन-मोहन सिंग’ अशी टीका केली होती. याबाबत त्यांना विचारले असता, “मी अशा टीकांचा सामना करूनच आयुष्यभर जगलो आहे”, असं माजी पंतप्रधान म्हणाले होते. मे २०१९ मध्ये, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सिंग यांनी एनडीए सरकारला ‘शासन आणि जबाबदारीच्या अपयशाची दुःखद कहाणी’, असं म्हटलं होतं. “नरेंद्र मोदी यांचे सरकार भारतातील तरुण, शेतकरी, व्यापारी आणि प्रत्येक लोकशाही संस्थांसाठी सर्वात दुःखद आणि घातक ठरत आहेत”, असंही सिंग म्हणाले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, G-20 शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिंग म्हणाले होते की, “नवीन जागतिक व्यवस्था आणि रशिया-युक्रेन युद्धाचा धोका यामध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे. नवी दिल्लीने आपले सार्वभौमत्व आणि आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देऊन चांगले काम करून शांततेचे आवाहन केले आहे. भारताच्या भवितव्याच्या चिंतेपेक्षाही मी आशावादी आहे. परंतु हा आशावाद भारतात एक सुसंवादी समाज असण्यावर अवलंबून आहे.”
हेही वाचा : Congress Views on Savarkar : काँग्रेसचे सावरकरांबद्दलचे विचार कसे कठोर होत गेले?
लोकसभा निवडणुकीत मोदींनी केले होते गंभीर आरोप
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला होता. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात अर्थसंकल्पातील बजेटमधून १५ टक्के वाटा अल्पसंख्याकांना देण्याची तयारी केली होती, असं मोदींनी म्हटलं होतं. राजस्थानमधील एका भाषणात, मोदींनी राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीतील मनमोहन सिंग यांच्या डिसेंबर २००६ मधील भाषणाचा संदर्भ दिला होता. “काँग्रेस सरकारला देशाच्या मालमत्तेवर पहिला अधिकार मुस्लिमांचा हवा होता. त्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात असे सूचित केले होते की. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार आमच्या माता-भगिनींचे सोने आणि पैसे वाटून अल्पसंख्यांकांमध्ये वाटून देणार आहेत.”, असा दावा मोदींनी केला होता.
मोदींच्या भाषणावर मनमोहन सिंग यांनी घेतला होता आक्षेप
निवडणूक प्रचार संपल्यानंतर मनमोहन सिंग यांनी मोदींच्या या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली होती. “पंतप्रधानांनी सर्वात वाईट आणि समाजात फूट पाडणारी द्वेषपूर्ण भाषणं केली असून ज्यामुळे सार्वजनिक भाषणाचे आणि पंतप्रधानपदाचे गांभीर्य कमी झालं आहे, असा आरोप मनमोहन सिंग यांनी केला. “यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने समाजातील विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी इतके घृणास्पद, असंसदीय आणि असभ्य शब्द वापरलेले नाहीत. अमानवीकरणाची ही कहाणी आता शिगेला पोहोचली आहे”, अशी टीकाही त्यांनी केली होती.
पंजाबच्या मतदारांना केलं होतं आवाहन
निवडणुकीदरम्यान पंजाबच्या मतदारांना आवाहन करताना मनमोहन सिंग म्हणाले की, “गेल्या १० वर्षात भाजप सरकारने पंजाब, पंजाबी आणि पंजाबियत यांना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.” दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा देखील त्यांनी उल्लेख केला होता. “शेतकऱ्यांवरील लाठीमार, रबराच्या गोळ्या पुरेशा नव्हत्या म्हणून पंतप्रधानांनी संसदेत आमच्या शेतकऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ आणि ‘परजीवी’ म्हणून शाब्दिक हल्ला चढवला, असा हल्लाबोलही मनमोहन सिंग यांनी केला होता.