छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये ‘संविधान बचाव’ च्या संदेशामुळे एकवटलेला दलित , ‘असुरक्षित’ भावनेमुळे ‘महायुती’च्या विरोधात असणारा मुस्लिम आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे असंतोष एकवटणारा मराठा ही तयार मतपेढी जरांगे यांच्या छायाचित्राच्या मागे उभा करण्याचा संकल्प गुरुवारी आंतरवली सराटीमध्ये करण्यात आला. धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमाणी, आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर तसेच महानुभाव पंथाचे धर्मगुरू या बैठकीस उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीमध्ये ‘महाविकास आघाडी’च्या पाठिशी उभी असणारी मतपेढी ‘अपक्ष’ उमेदवारांच्या पाठिशी उभी राहील काय, अशी चर्चा आता मराठवाड्यात सुरू झाली आहे. या नव्या चर्चेमुळे प्रस्थापित मराठा उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाजूने दलित व मुस्लिम मतदार उभा राहिल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीमध्ये होते. मराठा उमेदवार आणि दलित – मुस्लिमांची एकत्रित मते झाल्याने महाविकास आघाडीचे काही खासदार लाखभराच्या फरकाने निवडून आले होते. परभणी, हिंगोली, धाराशिव आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये ‘जरांगे पारुपा’चा परिणाम होईल असे आता सांगण्यात येत आहे. किती मतदारसंघात जरांगे यांचे उमेदवार उभे राहणार आणि ते कोण याची नावे जाहीर केली जाणार असल्याने त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होईल असे मानले जात आहे. पण निवडणुकीतील प्रमुख विरोध ‘भाजप’ला असेल, असे सांगण्यात येत आहे. फडणवीस विरोधाची धार एकत्र केल्यानंतर ‘महाविकास आघाडी’मागे गेलेली मतपेढी ‘अपक्ष’ उमेदवारांच्या मागे कोठे उभी राहू शकते, याची चाचपणी आंतरवलीमध्ये केली जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मुस्लिम मौलाना, दलित समाजातील काही नेत्यांशी जरांगे यांनी चर्चा केली.

हेही वाचा – तीन दिवस मुक्काम पोस्ट बारामती : औचित्य दिवाळी; उद्दिष्ट प्रचार!

हेही वाचा – धनगर समाजाच्या पदरी निराशा

प्रकाश आंबेडकर यांनी मात्र जरांगे वजा करुन वंचित बहुजन आघाडीचे राजकारण असेल असे अलिकडेच जाहीर केले होते. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय दलित मतांचे समीकरण नव्याने मांडण्याची प्रक्रिया हाती घेतली जात आहे. नामनिर्देशन पत्र काढून घेण्याच्या प्रक्रियेनंतर मराठवाड्यासह जरांगे कोणत्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी बाहेर पडतात, यावरही नवी गणिते आखली जातील, असे सांगण्यात येत आहे.