छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघामध्ये ३० आमदार मराठा. त्यातील १८ आमदार भाजप आणि त्यांच्या नव्या मित्रपक्षांचे, म्हणजे शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादीच्या (अजित पवार) यांच्या गटाचे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अपक्ष उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला. पण पाडापाडीत आपला ‘ करेक्ट कार्यक्रम’ तर होणार नाही ना, अशी भीती अजूनही सत्ताधाऱ्यांमध्ये कायम आहे. मात्र, रोष निर्माण करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना हाताळता येण्याची संधीही जरांगे यांच्या बोलण्यामुळे मिळाली आहे. त्यामुळे मराठा मतपेढीला आकारच मिळू शकणार नाही, असाही दावा केला जात आहे.
उमेदवार निवडीच्या कसरती सुरू असताना मराठा मतपेढीला लोकसभेत आकार येण्याची शक्यता कमी झाली आहे. ‘समाजाने ठरवावे कोणाला पाडावे, करेक्ट कार्यक्रम करावा’ या काही वक्तव्यामुळे मतदानाचा कल सत्ताधारी विरोधी रहावा, असे संकेत जरांगे यांनी दिले असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल आहे. जरांगे यांनी समाज निर्णय घेईल असे सांगितल्याने गावोगावी सकल मराठा समाजाचे आंदोलन चालविणाऱ्या तरुणांना ‘आपापल्या नेत्यांचे’ काम करता येईल, असेही सांगण्यात येत आहे. एरवी जातीच्या दडपणामुळे पुढाऱ्यांना गावबंदी करणाऱ्या तरुणांची इच्छा असूनही राजकारणात भाग घेता आला नसता. आता ही मंडळी आपापल्या नेत्यांचे काम करेल. परिणामी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोषाची ‘ मतपेढी’ काही मोजक्याच मतदारसंघात काम करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा : काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये निवडून आलेल्या खासदारांपैकी पाच खासदार मराठा आहेत. यामध्ये रावसाहेब दानवे, प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील हे तीन खासदार सत्ताधारी गटाचे आहेत. या तिघांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे परभणी व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील खासदारही मराठा आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप, शिंदेसेना तसेच अजित पवार यांच्या औरंगाबादमधून हरिभाऊ बागडे, संदीपान भुमरे, रमेश बोरनारे यांच्यासह पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे असे पाच मराठा आमदार आहेत. यातील संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ जरी जालना लोकसभा मतदारसंघात येत असला तरी ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जालना जिल्ह्यात संतोष दानवे, बबनराव लोणीकर, परभणीमध्ये मेघना बोर्डीकर तर नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांना आमदारांच्या यादीतून वजा केले तरी ते आता खासदार झाले आहेत. शिवाय बालाजी कल्याणकर, राजेश पवार यांच्याशिवाय शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे नांदेडचे नेतेही भाजपच्या बाजूचेच आहेत. नांदेड जिल्ह्यातील नऊ पैकी सहा आमदार मराठा आहेत. त्यातील तीन जण सत्ताधारी बाजूचे आहेत.
बीड जिल्ह्याची निवडणूक जातीच्या आधारे हाेतेच होते. या मतदारसंघावर ओबीसी नेते आपल्यावर राज्य करतात, अशी मराठा नेत्यांची भावना. मात्र, या जिल्ह्यात अजित पवार गटाचे वर्चस्व प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे हे दोघे मराठा नेते. तर गेवराईचे लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांना मानणारे. याच भागातून मराठा आरक्षण आंदोलनाला अधिक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या जिल्ह्यातून ‘ मराठा’ उमेदवार उभा करण्याची तयारी शरद पवार यांच्याकडून सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजीतसिंह पाटील, तानाजी सावंत, हिंगोलीमध्ये तान्हाजी मुटकुळे, अजित पवार गटाचे राजू नवघरे ही मंडळी ‘ सत्ताधारी’ मंडळी विषयी असणारा मराठा समाजातील राेष कमी करतील का, यावर निवडणूकांचे निकाल ठरू शकतील.