जालना : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी यासंदर्भात भूमिका जाहीर करण्याचे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते. परंतु आता यासंदर्भात ३१ ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यात येईल आणि या दिवशी निर्णय झाला नाही तर २ नोव्हेंबर रोजी शक्यतो निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी बुधवारी आंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे राज्यातील विविध मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छिणारांच्या मनात जरांगे यांच्या निर्णयाबाबतची उत्सुकता ताणली गेली असून, संभ्रमावस्थाही निर्माण झाली आहे.

उमेदवार उभे करणे किंवा उमेदवार पाडणे आणि अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षित मतदारसंघात पाठिंबा देण्यासंदर्भात जरांगे ३० ऑक्टोबर रोजी निर्णय घेणार होते. परंतु ताप आल्याने बुधवारी त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीस मुस्लिम मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्यांना व इतरांना बैठकीसाठी होणार आहे. आंतरवाली सराटीत होणाऱ्या निर्णयाचा आणि पैशाचा संबंध नाही. आम्ही पैसावर नाहीतर समाज काय म्हणतो त्यावर निर्णय घेतो. आपल्या पाठिंब्यावर बुधवारी सकाळी पाच-सात आमदार आले होते. त्यांच्या तोंडावर आपण हे सांगितले. आपल्याला भेटायचे असेल तर कुणाच्या वशिल्याची आवश्यकता नाही. सर्वांसाठी आंतरवाली सराटीचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे जरांगे म्हणाले.

हेही वाचा : राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

फडणवीसांवर घणाघात

● १४ महिने सांगूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही. त्यांच्यासारखा विश्वासघातकी माणूस इतिहासात घडला नसेल. तोडून-फोडून सरकार करणारे तुम्हीच आहात.

● ४० वर्षे ज्यांच्याबरोबर पटले नाही त्यांच्याबरोबर तुम्ही खुर्चीसाठी एकत्र आलात. यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघास तुम्ही नाराज केले असेही, असेही जरांगे फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

● अलीकडेच ओबीसीमध्ये नवीन सतरा जातींना आरक्षण दिले. मराठा आणि ओबीसी हिंदूच आहेत. त्यामध्ये अर्धे मराठा आहेत. परंतु फडणवीस यांनी मराठा समाजाची दखल घेणयाऐवजी त्यांच्यात आणि ओबीसींमध्ये फूट पाडली, असा आरोपही जरांगे यांनी केला.