लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनोज जरांगे यांच्याकडे विविध मतदारसंघात आंदोलनातील सामान्य सक्रिय कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. अनेकांनी प्रचाराच्या एक-दोन फेऱ्याही पूर्ण केल्या होत्या. जरांगे यांनी अखेरच्या क्षणी भूमिका बदलल्याने इच्छुकांचा हिरमोड होऊन नाराजांची संख्या वाढली. समाजात वेगळा संदेश गेल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. याचा मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनास फटका बसणार असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जरांगे यांनी मराठा समाज म्हणूनयनिवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केल्याचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत. जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, निफाड, येवला, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व अशा काही मतदारसंघात जरांगे यांच्या सूचनेनुसार मराठा समाजातील इच्छुकांनी अर्ज भरले होते. अखेरच्या क्षणी निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडल्याने चर्चा आणि एका नावावर मतैक्य घडविण्यास पुरेसा अवधी न मिळाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
आणखी वाचा-Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
नांदगावमधून पाच ते सहा इच्छुकांनी अर्ज भरले होते. यात सुरुवातीपासून जरांगे यांच्याबरोबर सक्रिय राहणारे आंदोलक नाना बच्छाव यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह अनेक जण रविवारी रात्री उशिरा आंतरवली सराटी येथून माघारी परतले. नांदगावमध्ये प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे ओबीसी समाजातील उमेदवार आहेत. या ठिकाणी मराठा समाजाच्या उमेदवारास एकगठ्ठा मते मिळाली असती. नांदगावसह येवला मतदारसंघात असेच पोषक वातावरण होते. परंतु, जरांगे यांनी घुमजाव केल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. लढण्याची शस्त्र काढून घेतल्याने गोंधळ वाढला. याचे दूरगामी परिणाम मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनावर होणार असल्याचे नाना बच्छाव यांनी नमूद केले. चर्चा करायला कमी अवधी मिळाला. इच्छुक उमेदवार आपसात चर्चा करून निर्णय घेतील, असे त्यांनी सूचित केले.
कोट्यवधींच्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने निर्णय घेताना जबाबदारीचे दर्शन घडविणे अपेक्षित होते. निवडणूक लढायची नव्हती तर सारीपाट मांडण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही दिवसांपासून इच्छुक आंतरवली सराटीला ये-जा करीत होते. समाज निवडणुकीच्या मानसिकतेतून एकवटला होता. मात्र, अखेरीस जे काही घडले ते धक्कादायक आहे. इच्छुकांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराच्या एक-दोन फेऱ्याही पूर्ण केल्या आहेत. त्यांची ऊर्जा व्यर्थ गेली. विरोधकांकडून जरांगे हे भूमिका बदलतात, असा आरोप नेहमी केला जातो. त्यालाही यामुळे बळ मिळणार असल्याकडे काही कार्यकर्ते लक्ष वेधतात. आंदोलनाच्या निमित्ताने जरांगे यांच्यामागे एकवटलेला समाज विखुरण्याची ही नांदी असल्याचे काही जण मानतात. मराठा उमेदवार, त्यांचे नियोजन, तयारी व धावपळ थंडावली. विरोधकांना पुन्हा नवीन मुद्दा मिळाला. ही स्थिती असली तरी आम्ही जरांगे यांच्याबरोबरच राहू असे मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे पदाधिकारी राम खुर्दळ यांनी म्हटले आहे.