संतोष मासोळे
धुळे : पक्ष कोणताही असो. भ्रष्टाचार, गैरव्यवहाराविरोधात आवाज उठविणे, धुळेकरांना मूलभूत नागरी सुविधा कशा मिळतील याविषयी जागरूकता बाळगणे आणि त्यासाठी प्रस्थापितांशी लढा देणे, ही वैशिष्ट्ये असलेले मनोज मोरे ज्या पक्षात गेले तिथे आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी झाले आहेत. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असा प्रवास करून आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटात सक्रिय असणारे मोरे पक्षनिष्ठतेपेक्षा कामावर असलेल्या निष्ठेसाठी अधिक ओळखले जातात.
वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या मोरेंनी राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रवेश केला. त्यांचा वाढता दबदबा पाहून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिल्यावर पक्षाचे अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिका गाजवली. व्यवसायाने स्थापत्य कंत्राटदार असल्याने शहरातील रस्ते, गटारी, कचरा संकलन आणि पाणीपुरवठा अशा मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असलेल्या भागात जाऊन त्यांनी त्याठिकाणची परिस्थिती जाणून घेतली. दर्जाहीन कामांविरोधात आवाज उठविला. तेव्हापासून मोरे यांचे नाव राजकीय पटलावर चर्चेत आले. दोन वेळा नगरसेवक राहिलेले मोरे यांनी दहा वर्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षपदही सांभाळले. याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून चार वर्षे त्यांनी जबाबदारी पार पाडली. युवकांचे मोठे संघटन मोरे यांच्या पाठीशी राहिले आहे.
हेही वाचा : शिवराज मोरे : विद्यार्थी चळवळीतून राजकारणात
सार्वजनिक कामे करताना होणारा खर्च आणि त्या बदल्यात होणारी प्रत्यक्ष उपलब्धता यांची बेरीज-वजाबाकी मोरे यांनी अनेक वेळा मांडली आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षात ते आपली चमक दाखवू शकले. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर प्रहार आणि समाजोपयोगी सकारात्मक मुद्दयांवर प्रस्थापितांशी सतत संघर्ष अशी मोरे यांची कार्यशैली आहे. मुळातच बंडखोर स्वभाव असल्यामुळे मोरे हे कायम संघर्षशील राहिले आहेत. माजी आमदार अनिल गोटे विरुद्ध माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे, आपल्या नेत्यांवर गोटे यांच्याकडून केले जाणारे आरोप खोडून काढण्यासाठी मोरे यांनी स्वतः पुढे येऊन गोटे यांच्या टीकेला उत्तर देण्यास सुरुवात केली. यातून कदमबांडे बाजूला पडून मोरे विरुद्ध गोटे असा सामना रंगला.
हेही वाचा : डॉ. किरण लहामटे : अफाट जनसंपर्क
अतिशय कठोर आणि दूरदृष्टी, समयसूचकता ठेवून राजकारण करणाऱ्या अनिल गोटे यांना तेवढ्याच कठोर शब्दात उत्तर देऊन आव्हान उभे करणारा युवा नेता म्हणून मोरे यांची प्रतिमा तयार झाली. राष्ट्रवादीनंतर भाजप आणि नंतर शिवसेना अशी वाटचाल केल्यानंतर सध्या ते शिंदे गटात कार्यरत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे शहर अध्यक्ष म्हणूनही त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. महापालिकेच्या कामांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून त्या विरोधात आवाज उठविला.अनेक विषय यशस्वीरित्या मार्गी लावले. महाराष्ट्रात अग्रगण्य शहर म्हणून धुळे गणले गेले पाहिजे, धुळ्यात उद्योगधंदे आले पाहिजेत, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या मोरे यांची भविष्यात धुळे शहरातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.