छत्रपती संभाजीनगर : धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाने नव्याने दावा केला आहे. माजी खासदार आणि उमरग्याचे माजी आमदार रवींद्र गायकवाड यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे अलिकडेच जाहीर केले. याच मतदारसंघातून भाजपला निवडणूक लढायला मिळेल, या आशेवर छत्रपती संभाजीनगरातून भाजप सरचिटणीस बसवराज मंगरुळे यांनीही प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांचे मूळ गाव उमरगा तालुक्यातील मुरूम हे आहे. याशिवाय अजित पवार गटाचे भाऊसाहेब बिराजदार यांनाही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच तालुक्यातून लोकसभेसाठी तीन उमेदवार इच्छुक आहेत. या मतदारसंघातून भाजपनेही उमेदवार द्यावा, असे प्रयत्न सुरू असून राणा जगजीतसिंह पाटील यांचेही नाव चर्चेत आणले जात आहे. सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. उदगीरच्या अरविंद कांबळे यांचा मतदारसंघात फारसा संपर्क नसतानाही ते निवडून येत. तब्बल चार वेळा ते निवडून आले. पुढे त्यांना बार्शीचे शिवसेनेचे उमदेवार शिवाजी कांबळे यांनी पराभूत केले. धाराशिव व कळंब या दोन मतदारसंघातून तेव्हा शिवसैनिकांची संख्या वाढू लागली होती. मतदारांशी संपर्क नसतानाही अरविंद कांबळे निवडून कसे येतात, याचे गणित कधी काँग्रेसलाही उमगले नाही. मतदारांची मानसिकता काँग्रेस पक्षाशी जोडलेली होती. या मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर विमल मुंदडा यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कमळ चिन्ह धाराशिव मतदारसंघात दिसत नव्हते. परिणामी भाजपची अवस्था श्रेणी चारमधील कुपोषित बालकासारखी होती. २०१४ नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरू लागला. तत्पूर्वी लाेकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा वरचष्मा असे. आता तो शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा आहे. मात्र, यावेळी या मतदारसंघात परंडा मतदारसंघाचे आमदार व आरोग्यमंत्री तानाजी सावंतही दावा सांगत आहेत. त्यामुळे या वेळी लोकसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – रायगड लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा !
डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे बहुसंख्य समर्थक भाजपचे समर्थक बनले असल्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघावर मजबूत पकड बनली असल्याचा दावा केला जात आहे. भाजपने उमेदवारीसाठी चाचपणीही सुरू केली आहे. परंडा तालुक्यात भाजपच्या राज्यस्तरीय विविध पदांवर काम करणारे सुजितसिंह ठाकूर यांनीही आता नव्याने संपर्कास सुरुवात केली आहे. भाजपमधून तर उमेदवारी मिळावी यासाठी मोठी यादीच पुढे आणली जात आहे. त्याच वेळी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा आणि माजी आमदार बसवराज पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही काँग्रेसच्या वर्तुळातून केली जात आहे.
लाेकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचा झालेला पराभव ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अलिकडची महत्त्वाची घटना. या लोकसभा मतदारसंघात पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर झालेला प्रचार, अनेक दिवसांपासून असणारी सत्ताधारी विरोधी मानसिकता याचा परिणाम म्हणून ओम राजेनिंबाळकर निवडून आले. त्यांचा संपर्क आणि मतदारसंघातील वावर यामुळे त्यांनी त्यांचा प्रभाव निर्माण केला आहे. तो प्रभाव मोडून काढण्यात कोणता उमेदवार योग्य हे मात्र ठरत नसल्याने बहु झाले उमेदवार अशी स्थिती आहे.
हेही वाचा – तेलंगणाच्या निवडणुकीतील ‘ब’ चमूचे अपयश काँग्रेसच्या पथ्यावर पडेल ?
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
१९५२-१९५७ राघवेंद्र दिवाण- काँग्रेस
१९५७-६२ व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर- काँग्रेस
१९६२-६७ तुळशीदास पाटील- काँग्रेस
१९६७-७१ तुळशीराम पाटील- काँग्रेस
१९७१-७७ तुळशीराम पाटील- काँग्रेस
१९७७-८० टी.एस. श्रंगारे- काँग्रेस
१९८०-८४ टी.एन. सावंत- काँग्रेस(आय)
१९८४-८९ अरविंद कांबळे काँग्रेस (आय)
१९८९-९१ अरविंद कांबळे काँग्रेस(आय)
१९९१-९६ अरविंद कांबळे- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९६-९८ शिवाजी कांबळे- शिवसेना
१९९८-९९ अरविंद कांबळे- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९-२००४ शिवाजी कांबळे- शिवसेना
२००४-२००९ कल्पना नरहिरे- शिवसेना
२००९-२०१४ डॉ. पद्मसिंह पाटील- राष्ट्रवादी काँग्रेस
२०१४-२०१९ प्रा. रवींद्र गायकवाड- शिवसेना
२०१९-२०२४ ओमप्रकाश राजेनिंबाळकर- शिवसेना