अविनाश कवठेकर

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची वाट धरल्याने येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराबरोबरच जिल्ह्यातील शिवसेनेची पडझड होणार, हे निश्चित झाले आहे.

शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे एका पंचतारांकित हॉटेलात समर्थक आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेतील १२ खासदारही दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित राहिले होते. त्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार, उपनेता शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. आजी माजी खासदार शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला जिल्ह्यात सुरूंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला असून आढळराव पाटील यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसबाबतची नाराजी जाहीरपणे मंगळवारी व्यक्त केली.

हेही वाचा- प्रतीक जयंत पाटील यांच्या फलकांवरून पवार घराणे गायब

प्रारंभी खेड लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेनंतर लगेच असे सलग तीन वेळा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. पराभव जिव्हारी लागलेल्या आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष कायम ठेवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडी सरकारचे सरकार स्थापन झाले आणि आढळराव यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केल्यामुळे आढळराव यांची हकालपट्टी करण्यात आली आणि काही तासात ती मागे घेण्यात आली. मात्र दुखावलेल्या आढळरावांनी आता शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या काही नेत्यांवर जोरदार टीका केली.

हेही वाचा- सोलापुरात राष्ट्रवादीचे उरले सुरले गडही भाजपच्या रडारवर

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यास सांगितल्याने आणि ही बाब न पटल्याने शिंदे गटात गेल्याचे आढळराव यांनी सांगितले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली होती. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार लढणार होते. मात्र त्याला आपण विरोध केला. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष करून विजय मिळविला त्याच पक्षाच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच जुळवून घेण्याची सूचना केल्याने राजकीय पर्यायचा खुंटला, असे त्यांनी सांगितले.

आधी पाठिंबा, नंतर निर्णयात बदल

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत तेही शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा होती. त्यानुसार खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक माजी आमदार शरद सोनावणे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

बारणे-आढळराव समर्थकांचे राजीनाम्याचे संकेत

जिल्ह्यातील आढळराव आणि बारणे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे कोंडे यांचे वजन असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील शिवसेनेची वाट बिकट होणार असून हातावर मोजण्याएवढेच कार्यकर्ते राहण्याची शक्यता आहे. तर पुणे शहराची संपर्कप्रमुख म्हणून जबाबदरी असलेले आमदार सचिन आहिर आणि आदित्य शिरोडकर यांच्याजवळचे अनेक पदाधिकारी कार्यकर्तेही शिंदे गटाच्या मार्गावर आहेत.

Story img Loader