चंद्रशेखर बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या यवतमाळ -वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करून यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार करणारे हरीश सारडा यांनी रविवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत गवळींच्या मुद्यावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

विशेष म्हणजे, याच हरीश सारडा यांनी यापूर्वी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन खासदार गवळी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळेच सारडा पत्रकार परिषदेत गवळींविरुद्ध काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र सुरुवातीलाच त्यांनी आपण गवळींच्या मुद्यावर काहीही बोलणार, नाही असे जाहीर केले. सत्तांतरानंतर सारडा यांच्या बदललेल्या भूमिकेने अनेक नव्या शंकांना जन्म दिला आहे. खा. गवळी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचे रान उठवणारे सारडा यांचा सत्तांतरानंतर विरोध मावळला की, गवळीविरोधी मोहिमेला भाजपची फूस होती? अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

राज्यात सत्ताबदल झाल्यावर सारडा यांनी मुंबईत जाऊन शिंदे-फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचे छायाचित्रही माध्यमांमध्ये झळकले होते. या पार्श्वभूमीवर सारडा यांनी गवळी भ्रष्टाचार प्रकरणावरील मौन महत्त्वाचे ठरते. कारण सारडा यांनी भर पावसाळ्यात पाणी प्रश्नाच्या (वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प) मुद्यावर नागपुरात येऊन तातडीने पत्रकार परिषद घेणे ही बाबही अनाकलनीय ठरते. त्यांना हा मुद्दा वाशीममध्ये मांडता आला असता किंवा तो उन्हाळ्यात मांडणे सयुक्तिक ठरले असते. त्यामुळे सारडा यांना गवळी प्रकरणावरच पत्रकार परिषदेत बोलायचे होते व नंतर दबाव आल्यावर त्यांनी पाण्याचा मुद्दा पुढे केला का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात सारडा यांना विचारले असता ही राजकीय विषयावरील पत्रकार परिषद नव्हती, अशी सारवासारव त्यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many peoples saying that anti bhavna gawali campaign is started by bjp print politics news pkd