नाशिक – धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या हालचालींमुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यात राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच शहादा-तळोदा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्याविरोधात उमेदवारीसाठी मविआमध्ये अधिक चुरस असून काँग्रेसचे दहापेक्षा अधिक इच्छुक रांगेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे हेही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा >>> अकोल्यात निवडणुकीच्या तोंडावर जातीय तणावाचे समीकरण

महाविकास आघाडीत जागावाटपसंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसताना स्थानिक पातळीवर मात्र इच्छुकांकडून प्रचाराला सुरुवातही करण्यात आली आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे इच्छुकांचा सर्वाधिक ओघ असल्याचे चित्र दिसत असताना नंदुरबार जिल्ह्यातही त्याचे प्रत्यंतर येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाडळदा गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य मोहन शेवाळे यांनी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे. शेवाळे यांनी अलीकडेच अजित पवार गटाचे पालकमंत्री अनिल पाटील आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वात तळोदा तालुक्यातील बोरद येथे मेळावा घेत विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनसुब जाहीर केला होता. आदिवासींसाठी सतत आंदोलनांव्दारे आवाज उठविणारे आक्रमक लोकप्रतिनिधी अशी शेवाळे यांची प्रतिमा तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डाॅ. हिना गावित यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने ते अधिकच चर्चेत आले होते.

हेही वाचा >>> भोसरीत आमदार महेश लांडगेंची उमेदवारी निश्चित

भाजपकडून अजित पवार गटाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये शहादा-तळोदा मतदारसंघ विद्यमान आमदार भाजपचे असल्याने त्यांनाच सुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेवाळे यांनी शरद पवार यांची भेट घेत तुतारी हातात घेण्याचे निश्चित केले आहे. शेवाळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारीही त्यांच्यासमवेत होते. मुळात महाविकास आघाडीत तळोदा मतदारसंघ कोणाला सुटतो, याबाबत अद्याप निर्णय नाही.

शेवाळे यांनी तळोदा मतदारसंघातील उमेदवारीसंदर्भात आपली शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कोणाला सुटतो, यावर सर्व गणित अवलंबून असणार असून त्यानंतर आपली पुढील भूमिका जाहीर करण्याचे त्यांनी ठरविले आहे. नंदुरबार जिल्ह्यात मविआकडून सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे. काँग्रेसकडून दहा जण तयारीत असताना शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या धुळे दौऱ्यावेळी मतदाररसंघातील काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट, या भेटीगाठींच्या सत्रामुळे मविआत तळोदा मतदारसंघांसाठी असलेली चुरस लक्षवेधक ठरत आहे.