नागपूर : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत तर त्यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी नेतेही पुढे सरसावले आहेत. यानिमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र राज्यात निर्माण झाले असतानाच विदर्भातील ओबीसी नेते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या मुलाच्या दवाखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यातील मराठा व ओबीसी नेते व मंत्री एकत्र येत आहेत. तायवाडे यांचा हा खासगी कार्यक्रम असला तरी त्यांनी घेतलेल्या भूमिकेला (ओबीसी) छेद देणाऱ्या नेत्यांची नावे निमंत्रितांमध्ये असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे तसेच ओबीसी समाजाचेही लक्ष लागले आहे.
तायवाडे यांचे पुत्र डॉ. शॉनक तायवाडे आणि स्नुषा अंकिता तायवाडे यांच्या नागपूरमधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन शनिवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व इतरही नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
हेही वाचा – भाजपची उमेदवारी कोणाला आणि काँग्रेसला सूर गवसणार का ?
बबनराव तायवाडे हे ओबीसी नेते म्हणून सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींसाठी संघर्ष करतात. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केल्यावर त्याला विरोध करण्यासाठी तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन झाले होते. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासही तायवाडे यांचा विरोध आहे. ओबीसी आरक्षणात नवीन हिस्सेदार तयार होत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तायवाडेंकडे ओबीसी समाज आशेने बघत आहेत. मात्र त्यांच्या खासगी कार्यक्रमाला निमंत्रित नेत्यांची नावे पाहिली तर त्यामध्ये तायवाडेंच्या भूमिकेला छेद देणाऱ्या काही नेत्यांची नावे आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही असे म्हणत असले तरी जरांगे यांच्या सर्व अटी, शर्ती मान्य करण्याची भूमिका आजवर राज्य सरकारची राहिली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विरोध केलेला नाही. दुसरीकडे कट्टर ओबीसी समर्थक नेते म्हणून ओळख असणारे व जरांगे यांच्या अवास्तव मागण्यांना विरोध करणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले हेसुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित आहेत. त्यामुळे तायवाडे यांचा कार्यक्रम खासगी असला तरी तेथे कट्टर मराठा व ओबीसी समर्थक नेते एकत्र येत आहेत. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नेते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बबनराव तायवाडे यांनी मात्र हा कार्यक्रम खासगी असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले हा माझा कौटुंबिक कार्यक्रम आहे. ३० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात काम करीत असताना सर्वच पक्षांतील नेत्यांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे व व्यक्तिगत संबंध आहेत. याच कारणामुळे कुटुंबातील सदस्य म्हणून मी या नेत्यांना निमंत्रित केले व त्यांनी येण्यासही होकार दिलेला आहे. याकडे राजकीय किंवा सामाजिक भूमिकेतून पाहण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.