एक्स्प्रेस वृत्तसेवा
गुजरातमध्ये आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचे सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती याला दिले जात असले तरी या यशात एका मराठी नेत्याचाही वाटा तेवढाच महत्त्वाचा ठरतो. हे नेते आहेत गुजरात भाजपचे अध्यक्ष खासदार सी. आर. पाटील. मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले पाटील मोदी यांचे खास निकटवर्तीय मानले जातात.
महाराष्ट्रात विविध पक्षांमध्ये बाहेरच्या राज्यातील नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जातात. या तुलनेत अन्य राज्यांमध्ये मराठी नेते राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाच्या पदांवर अपवादात्मकच आढळतात. तरीही गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी मोदी व शहा यांनी दोन वर्षांपूर्वी मूळचे मराठी असलेल्या चंद्रकांत रघुनाथ उर्फ सी. आर. पाटील यांना संधी दिली. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या नवसारीचे खासदार असलेले पाटील हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक ६ लाख ८९ हजार एवढ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
हेही वाचा >>>“गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने ‘खेळ’ बिघडवला”; काँग्रेसच्या पराजयावर पी चिदंबरम यांचं विधान
पंतप्रधान मोदी यांचे पाटील विश्वासातील नेते समजले जातात. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तेव्हा मोदी यांनी समन्वयाकरिता पाटील यांची वाराणसीमध्ये नियुक्ती केली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांची गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. एका मराठी नेत्याकडे गुजरात भाजपची सूत्रे सोपविण्यात आल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात आले होते.
हेही वाचा >>>घराणेशाहीच्या राजकारणापासून काँग्रेसची फारकत; हिमाचल प्रदेशात नवा पायंडा
विधानसभा निवडणुकीची सारी व्यूहरचना पाटील यांनी आखली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांपासून ते अगदी पन्ना प्रमुखांपर्यंत त्यांनी संपर्क साधला होता. पक्ष संघटना अगदी तळागाळापर्यंत सक्रिय केली होती. सरकारच्या विरोधातील नाराजी दूर करण्याकरिता विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. निवडणुकीपूर्वी पक्षाने सर्वेक्षण करून कोणते मतदारसंघ आव्हानात्मक आहेत याचा अंदाज घेतला होता. अशा सर्व मतदारसंघांमध्ये पाटील यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतांचे गणित जुळविण्याव र भर दिला होता.
पोलीस दलात सेवा बजाविलेल्या पाटील यांना नंतर राजीनामा द्यावा लागला होता. तर एका सहकारी बँकेचे कर्ज बुडविल्याप्रकरणी पाटील यांच्या विरोधात कारवाई झाली होती. गुजरातमध्ये भाजपला घवघवीत यश मिळवून दिल्याने पाटील यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. पक्ष संघटनेत राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे पद किंवा २०२४ मध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.