‘‘साहित्याच्या वारीत दाटले मोहाचे धुके दाट

शब्दांच्या मांडवात नाचते कळपाची मेंढरास…’’

असेच काहीसे संतापजनक चित्र संमेलनाच्या शेवटच्या दिवशीचे होते. उद्घाटनासाखेच समारोपालाही राजकीय नेते येणार असल्याने दुपारपासूनच या नेत्यांवर जीव ओवाळणारे त्यांचे ‘प्राणप्रिय’ समर्थक गटागटाने संमेलनाच्या मांडवात दाखल होत होते. त्यांच्या अशा दाखल होण्याला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. हे नेते कार्यकर्त्यांचे ‘आयुष्य’ वैगेरे घडवत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हारतुरे आणण्यातही काही वावगे नाही. परंतु, नेत्यांच्या स्वागताला आपण जिथे जातोय तिथे नेमके काय सुरू आहे? ती निवडणुकीची जाहीर सभा आहे की पक्षाचे अधिवेशन, तिथे जाताना आपण कसे वागलो पाहिजे, याचे किमान भानही या कार्यकर्त्यांना नसावे? कार्यकर्ते तरुण दिसत असतानाही ‘अल्पबुद्धी’ वैगेरे असतील तर त्यांच्या ज्येष्ठ ‘दादा’, ‘भाई’, ‘साहेबा’नी त्यांना बुथ व्यवस्थापनासाठी करतात तसे मार्गदर्शन एकदाही करू नये? समाजाला वेगवेगळ्या गटांमध्येे विभाजित करून त्या गटांना सतत संघर्षरत ठेवणे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजत राहणे, हे ऐरवी राजकारण्यांचे अधिकृत लक्ष्य असले तरी त्याची प्रचिती साहित्य संमेलनाच्या मांडवात का यावी? पण, दुर्दैवाने ती आलीच.

संमेलनाच्या समारोपाला उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे अजित पवार येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाचे दुपट्टे घालून संमेलनात प्रवेश केला आणि आपल्या पक्षाच्या, नेत्यांच्या विजयाचे नारेही लावले. यातल्या काहींचे दुपट्टे सेनेच्या भगव्या रंगात रंगले होते तर काहींच्या दुपट्टयांवर घड्याळ मिरवत होते. दारात कुठलीही गाडी आली की, या कार्यकर्त्यांना जोश यायचा आणि नारे आणखी बुलंद होऊ लागायचे. पक्षाचा भगवा मिरवत जिथे ही नारेबाजी सुरू होती त्याच्या अगदी बाजूलाच शिवरायांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा ठेवला होता आणि महाराजांनी विषमतावादी, शोषकसंस्कृतीविरोधात जो भगवा मावळयांच्या हाती दिला तो अभिमानाने डोलत होता. खरं तर महाराजांच्या जाज्वल्य न्यायनितीचे प्रतीक असलेला ध्वज संमेलनाच्या प्रवेशद्वारावरच डौलताना बघून कार्यकर्त्यांच्या हातातील राजकीय ध्वज तिथेच गळून पडायला हवा होता. परंतु, राजकीय मोतीबिंदूने ग्रासलेल्या कार्यकर्त्यांना तो ध्वज दिसला असेल का, हाच खरा प्रश्न आहे. तो दिसला असता तर शिवरायांच्या साक्षीने मायमराठीच्या अभिजाततेचा गजर होत असताना त्याला तुल्यबळ आवाजात भाई, दादा जिंदाबादचे नारे लागलेच नसते. साहित्य संमेलनाच्या मांडवात ही अशी दुपट्ट्यांची ‘दांडगाई’ सुरू असताना सकस वाङ्मयीन चर्चा ऐकण्याच्या अपेक्षेने देशभरातून आलेली मराठी माणसे स्तब्ध झाली होती. ही स्तब्धता संतापात बदलली नाही, कारण मराठी संस्कार आडवे आले असावे कदाचित. नाही तर संमेलनाच्या समारोपाचे चित्र बदलायला वेळ लागला नसता…..

Story img Loader