छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदानोत्तर चाचण्यांचा कौल लक्षात घेता महाविकास आघाडीला साथ मिळेल असे चित्र दिसून येते. मराठवाड्यात महायुतीला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांपासून भाजप नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढले होते. मात्र, तरीही मराठवाड्यात महायुतीला फारसे यश मिळणार नाही, असेच कौल सांगत आहेत. मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचे एकत्रिकरण महाविकास आघाडीच्या बाजूला उभे ठाकल्याचे चित्र होते.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये विजयी उमेदवार आणि प्रतिस्पर्धी उमेदवारामध्ये पाच ते दहा हजारांचाच फरक असेल असे सांगण्यात येत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व बीड या चार मतदारसंघांत मराठा मतांचे एकत्रिकरण मोठ्या प्रमाणावर झाले. त्यामुळे बीडच्या निकालाबाबत अधिक उत्सुकता होती. या मतदारसंघात मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्याही तक्रारी करण्यात आल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यात बीडची एकमेव जागा लढविली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागांवर यश मिळेल, असा दावा केला जात आहे.
हेही वाचा – एकमेकांवर टीका करणाऱ्या तृणमूल-भाजपाने अचानक डाव्यांकडे का वळवला आहे मोर्चा?
उस्मानाबाद, लातूर या दोन लोकसभा मतदारसंघात मराठा एकत्रिकरणाच्या जरांगे पाटील यांचा प्रभाव फारसा जाणवत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षात अटीतटीची लढत झाली आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळत असल्याचे मतचाचणीच्या कौलातून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्यानंतरही मराठवाड्यातील प्रचाराचा केंद्रबिंदू जात असल्याने मराठवाड्यात एनडीए ऐवजी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदार स्वीकारतील असे मतकौल चाचणीच्या अहवालात सांगितले जात आहे.