छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी १९ मतदारसंघातील आमदार दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा निवडून आलेले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील १५ आमदार आहेत. मराठा – ओबीसी वादाभोवतीच्या गुंफल्या जाऊ शकणाऱ्या मराठवाड्यातील या निवडणुकीमध्ये सत्ताविरोधी रोषाला या मतदारसंघात उत्तर म्हणून केवळ ‘ लाडकी बहीण ’ हीच हुकमी योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात केवळ महायुतीच नाही तर महाविकास आघाडीने पहिले अडीच वर्षे सत्ता उपभोगली असल्याने सलग पाच वेळा निवडून येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे, लातूरचे आमदार अमित देशमुख यांनाही या रोषाचा सामना करावा लागणार आहे.

मराठवाड्याच्या राजकारणात महायुतीमध्ये सत्ता विरोधी रोषाचा सामना करावा लागू शकतो अशा मतदारसंघामध्ये मंत्री अतुल सावे, मंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. मराठा आंदोलनाच्या काळात ओबीसी कल्याण मंत्रालयाचा कारभार पाहणारे मंत्री अतुल सावे यांचे राजकीय काम तसे निष्प्रभच राहिल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. मंत्री सत्तार यांच्या विरोधात सतत न्यायालयानेही ताशेरे आेढले. सिल्लोड मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्तेही त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. या रोषातून मुक्त झालेले दोन नेते आहेत. यात प्रामुख्याने हरिभाऊ बागडे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. एकूण पाच वेळा निवडून आलेल्या हरिभाऊ बागडे गेल्या दोन टर्ममध्ये सलग निवडून आले होते. ते आता राजस्थानचे राज्यपाल आहेत. संदीपान भुमरे हेही पाच वेळा निवडून आले. ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत. मात्र, ते त्यांच्या मुलास उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सत्ताविरोधी मतांची मानसिकता या मतदारसंघातही असणार आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?

दोन वेळा निवडून येणारे सत्ताधारी आमदार

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे दोन वेळा भोकरदन मतदारसंघातून निवडून आले. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांना आघाडी मिळाली नव्हती. त्यामुळे सत्ताविरोधी मतदारांच्या मनातील रोष फक्त लाडकी बहीण योजनेतून दूर होईल का या विषयी भाजप नेत्यांच्या मनात शंका आहेत. निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, तानाजी मुटकुळे, बबन लोणीकर, तुषार राठोड ही कमळ चिन्हावर निवडून येणाऱ्या मंडळींना मतदारसंघात विरोधी जनमताचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय गंगाखेडसारख्या मतदारसंघात तुरुंगातून निवडणूक लढविणारे रत्नाकर गुट्टे यांना साथ मिळाली होती. त्यांच्या विषयी रोष व्यक्त होत असतो. याशिवाय छत्रपती संभाजीनगर शहरातून सलग तीन वेळा निवडून आलेले सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, नारायण कुचे यांनाही जनमताच्या रोषाला सामारे जावे लागू शकते.

हेही वाचा : बच्‍चू कडूंचा रवी राणांवर ‘प्रहार’, रवी राणांच्‍या विश्‍वासू सहकाऱ्याला घेतले पक्षात

राजेश टोपे व अमित देशमुख यांच्या विरोधातही सत्ताविरोधी मत ?

घनसांवगी मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधीत्व करणारे राजेश टोपे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य मंत्री पद सांभाळले. तेव्हा राजेश टोपे यांनी उत्तम काम केल्याची चर्चा होती. धारावी सारख्या भागात आणि मुंबईत रेल्वे स्थानकावर फिरुन कोविड नियंत्रणात त्यांनी योगदान दिले होते. पाच वेळा निवडून येताना समर्थ आणि सागर साखर कारखानेही चालवले. मात्र, संस्थात्मक कामातून येणारा या मतदारसंघात असू शकतो असे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात मंत्री पद सांभाळणारे अमित देशमुख हे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार. त्यांनीही वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम केले. मात्र, राजेश टोपेंच्या तुलनेत त्यांचे काम कधी ठसठशीतपणे दिसून आले नाही. त्यामुळे ‘ मराठा – ओबीसी’ या टोकदार मुद्दयांभोवती जनमताचा रोष हाही मुद्दा निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

Story img Loader