सुहास सरदेशमुख

राज्यात ‘शिंदे-फडणवीस’ सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीपदाची वर्णी लागावी, यासाठी मराठवाड्यातील नेत्यांच्या समर्थकांनी पायी दिंडी आणि महाआरत्यांचेही आयोजन सुरू केले आहे. आम्हीच अधिक हिंदुत्ववादी असे सांगण्याचा आणि त्यानिमित्त समर्थकांची मोट बांधण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवरही दुग्धाभिषेक केला होता. तसेच राज्यातील पक्षनेतृत्वाच्या विरोधात घोषणा देण्यापासून ते तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीच्या ताफ्यासमोरही निदर्शने केली.

शिंदे-फडणवीस ‘’महाशक्ती’’च्या भेटीला, मंत्रिमंडळ विस्तारावर कोणाचे वर्चस्व?

आता राज्यात सत्तांतर होऊन भाजप सत्तेत आल्याने कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बीड शहरातून महिला कार्यकर्त्यांनी मोहटादेवीच्या मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दिंडीचे प्रस्थानही झाले आहे. बीड जिल्ह्यात सुरेश धस यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही तुळजापूरच्या देवीला साकडे घातले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळावे म्हणून धारासूरमर्दिनी देवीच्या मंदिरासमोर कार्यकर्त्यांनी महाआरतीचे आयोजन केले आहे. मंत्रीपद मिळविण्यापूर्वी शक्तिप्रदर्शन केले जाते. नेत्यांपर्यंत आपले नाव वेगवेगळ्या मार्गाने पोहोचावे, असे प्रयत्नही केले जातात. मात्र, आता कार्यकर्ते मंत्रीपदासाठी साकडेही घालू लागले आहेत. सभांमध्ये आपल्या भागातील नेता बोलायला उभा राहिला की मोठ्यांदा घोषणा देण्याची पद्धत राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर सुरू असते. शेलक्या शब्दात विरोधकांना हिणवणे असे प्रकारही सुरू असतात. मंत्रिपदासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना एरवी शक्तिप्रदर्शनाची जोड दिली जात असे. मात्र, आता कार्यकर्ते धार्मिक उपक्रमही आखू लागले आहेत. राम मंदिर आंदोलनाच्या काळात राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या आरत्यांना महाआरती असा शब्द प्रयोग लागला. पुढे हा प्रकार शिवसेनेतही स्थिरावला. कट्टर हिंदुत्वाचे प्रतीक बनून राहिलेली आरती आता मंत्रीपद मिळवण्यासाठीही वापरली जात आहे.

गड किल्ले आणि मंदिरे राजकीय नेत्यांनी देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होणे ही कृती वैयक्तिक बाब मानली जात असे. मात्र, बीड जिल्ह्यात बहुतांश मंदिरांमध्ये कोणत्या राजकीय नेत्यांनी कधी जायचे याचे वेळापत्रक ठरले आहे. भगवान गड तसेच अनेक गडांवर भेटी देणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांनी आता मोहटादेवी हे नवे केंद्र बनविले आहे. संजय राठोड यांच्यावरील आरोपानंतर ते मोहटादेवी येथे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर मोहटादेवीला राजकीय नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी वाढल्या. नुकतेच पंकजा मुंडे यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडीही काढली आहे.

Story img Loader