भारत जोडो यात्रेत दक्षिणेतील पावणे दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासात भात आणि तांदळाच्या विविध पदार्थांची चव चाखल्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतयात्री आणि अन्य मान्यवरांचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर त्यांच्या भोजन व न्याहरीच्या व्यवस्थेत मराठवाडा आणि खान्देशातील पाककृतींवर भर ठेवण्यात येणार आहे. खास मराठवाड्यातील दही-धपाटे, थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठलं याबरोबरच खान्देशातील शेवभाजी, वांग्याचे भरीत आदी पदार्थांचा त्यात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- राहुल गांधींच्या यात्रेनिमित्त पश्चिम वऱ्हाडात ‘काँग्रेस जोडो’; रसातळाला गेलेल्या पक्षाला नवे बळ मिळणार?

खासदार गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून येथून ती हिंगोली जिल्ह्यात प्रस्थान करेपर्यंत भोजन व न्याहरीच्या व्यवस्थेचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. शाकाहारी पध्दतीच्या मुख्य भोजनाची संपूर्ण व्यवस्था नांदेडमधील अनुभवी केटरर दडू पुरोहित यांच्याकडे सोपविण्यात आली असून यात्रेच्या चार दिवसांच्या मुक्कामातील एकंदर दहा भोजनांमध्ये मराठवाडा आणि खान्देशातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचे नियोजन केले आहे. त्याची चाचणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या जन्मदिनी त्यांच्याच उपस्थितीत शुक्रवारी रात्री झाली. 

खासदार गांधी व अन्य यात्री दिवसभरात २५ ते ३० कि.मी अंतर चालत असल्यामुळे येणारा थकवा तसेच दररोज खर्ची पडणारी शारीरिक ऊर्जा याचा विचार करून आहारतज्ज्ञांनी या यात्रेकरूंच्या दैनंदिन आहारात शुद्ध तसेच प्रथिनेयुक्त आणि पिष्टमय खाद्यपदार्थ सुचविले आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या भोजनांची व्यवस्थाही सुचविण्यात आली आहे. 

हेही वाचा- पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीतील जुन्या संघर्षाचा नवा डाव

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील अनेक खाद्यपदार्थांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यावर यात्रेकरूंना सकाळच्या न्याहरीमध्ये दाक्षिणात्य इडली, वडासांबरशिवाय चमचमीत कांदेपोहे, प्रथिनेयुक्त मुग-मटकी दिली जाणार आहे. दही-धपाटे, खुमासदार कांदा थालीपीठ यात्रेकरूंना खिलवले जाणार आहे. दुपारच्या सत्रात ब्रेड-बटर सँडवीचशिवाय वडापावदेखील ठेवला जाणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात थंडी हळूहळू वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर चपाती, फुलके, तंदूर रोटी, ज्वारीची भाकरी यांच्यासोबत बाजरीच्या भाकरीचीही व्यवस्था एक-दोन जेवणांमध्ये राहणार असून त्यासोबत लोणी, पिठलं, भरीत, शेवभाजी, हिरव्या मिरचीचा ठेचा अशा झणझणीत पदार्थांचीही जोड राहणार आहे.

भोजन व्यवस्थेमध्ये गोड पदार्थांची रेलचेलही आहेच; पण खासदार गांधी व इतर यात्रेकरूंचा महाराष्ट्रीय पुरणपोळीनेही पाहुणचार केला जाणार आहे. साध्या किंवा फोडणीच्या वरणासोबत मराठवाडी आंबट वरणाची तसेच पालक व इतर पालेभाज्या मिसळून केली जाणारी पातळ भाजीही जेवणामध्ये दिली जाणार आहे. पनीरचे काही पदार्थही केले जाणार आहेत. 

हेही वाचा- गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; लिंग गुणोत्तर, साक्षरतेची काय स्थिती?

कांदाभजी, पकोडे हेही भोजन व्यवस्थेत आहेतच; पण दुपारच्या एका भोजनात अळूच्या पानांचे भजेही दिले जाणार आहेत. पापड, कुरोड्या, लोणची, वेगवेगळ्या चटण्या असे विविध प्रकार पाहुण्यांना चाखता येतीलच. कढी व दालखिचडी असाही बेत राहणार आहे. भारतयात्रींमध्ये विविध प्रांतातले नेते-कार्यकर्ते सहभागी आहेत. त्या सर्वांना रूचेल आणि पचेल असे भोजन देण्यावर नांदेडच्या आयोजकांनी भर दिला आहे. 

भारत जोडो यात्रेकरू व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आणि योग्य त्या बंदोबस्तात केली जाणार आहे. त्याशिवाय यात्रेदरम्यान जिल्ह्यातील ४ ते ५ हजार कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली जाणार आहे. खा.भास्करराव खतगावकर व डॉ.मीनल खतगावकर, माजी आ.वसंतराव चव्हाण, मारोतराव कवळे, मोहन हंबर्डे आदी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील भोजन व्यवस्थेचा भार उचलला आहे. राहुल गांधी यांची नांदेडमधील सभा १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ही यात्रा हिंगोली जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwadi khandesi meal planned for rahul gandhi and other leaders during bharat jodo yatra in nanded district print politics news dpj