अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली आहे. कर्जत आणि खालापूर मधील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजिनामे दिले आहेत. सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. या बंडखोरीमुळे महायुतीचे उमेदवार असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी मात्र वाढणार आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदार संघावर काही दिवसांपुर्वी दावा सांगितला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेसाठी आग्रही असल्याचेही जाहीर केले होते. सुधाकर घारे यांना त्यांनी निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते. तटकरेंच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील वाद विकोपाला गेले होते. आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युती धर्म पाळला नाही, तर श्रीवर्धन मधून शिवसेना शिंदे गट आपाला उमेदवार देईल असा थेट इशारा दिला होता. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी श्रीवर्धन मतदारसंघावर दावा सांगत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती.
आणखी वाचा-वर्सोवामध्ये इच्छुकांची रीघ; काँग्रेसमधून २१ इच्छुक उमेदवारांचे अर्ज, ठाकरे गटही आग्रही
महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाने महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजिनामे देत असल्याचे जाहीर केले आहे. सुधाकर घारे यांनी पत्रकार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. कुठल्याही परिस्थितीत थोरवे यांचे काम करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारसंघात महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील या बंडखोरीमुळे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढणार आहेत. महायुतीच्या मतविभाजनाचा फटका त्यांना बसू शकणार आहे. लोकसभा निवडणूकीत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सहकार्य केले नसल्याचे आरोप केले होते, तेव्हाही त्यांचा रोख कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-शेकाप ‘मविआ’तील समावेशाबाबत आशावादी; विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा
तटकरेंचा पाठिंबा ?
सुधाकर घारे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे अत्यंत विश्वासु सहकारी अशी त्यांची ओळख आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश लाड यांच्या राजिनाम्यानंतर सुनील तटकरे यांनी घारे यांच्याकडे मतदारसंघाची सुत्र त्यांच्याकडे सोपवली होती. शिवसेना शिंदे गटाशी दोन हात करत घारे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले होते.
© The Indian Express (P) Ltd