नवी मुंबई : ‘पन्नाशी गाठत असताना मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या नेते मंडळींची अलिकडच्या काळात भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस अशा मोठया नेत्यांच्या भेटी घेतल्या. माझी पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड करण्यात ज्यांनी महत्वाची भूमीका बजावली ते विद्यमान मुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठीही मी गेलो. मात्र त्यांनी मला दीड तास दालनाबाहेर बसवून ठेवले. कदाचित दादा नाराज असावेत’ या शब्दात माथाडी कामगारांचे नेते आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपला अनुभव सांगितला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबईतील कृषी मालाच्या बाजारपेठांमधील माथाडी कामगारांच्या संघटनेत महत्वाची भूमीका बजाविणारे आणि अलिकडच्या काळात भाजपशी सलगी करत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्षपद पटकाविणारे नरेंद्र पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसानिमीत्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच वाशीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माथाडी संघटनेतील त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील आमदार शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी केलेले भाषण लक्षवेधी ठरले.
दादा अजूनही नाराज असावेत
वयाच्या पन्नाशीत प्रवेश करत असताना माझ्या राजकीय कारकिर्दीत ज्यांनी महत्वाची भूमीका बजावली अशा नेत्यांना भेटून त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करायचे मी ठरविले होते. त्यानुसार शरद पवार यांची भेट घेतली. २०१९ नंतर मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो. या भेटीचे त्यांनीही कौतुक केले. त्यांनाही खुप बर वाटले असावे असे मला वाटले. पवारांनी या भेटीत वडिलांच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. मी देखील काही जुन्या आठवणी सांगितल्या. माझ मन त्यांच्यापुढे मोकळे केले आणि त्यांना सोडून गेलो याबद्दल त्यांची माफीही मागितली, असे नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले. वयाची पन्नाशी गाठत असताना कधी चुकुन तुम्हाला दुखवले असेल तर मी क्षमा मागतो असेही त्यांना म्हणालो. शरद पवारांप्रमाणेच अजितदादांनाही मी भेटीची वेळ मागितली होती. कारण मी त्यांचेही मन दुखावले असावे असे मला वाटत होते. माझी पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड झाली त्यात अजितदादांचा मोठा वाटा होता. दादांनी जर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तीन ते चार तास जर खलबते केली नसती तर माझी निवड नक्कीच हुकली असती. त्यांनाही मी सोडून गेलो, त्यामुळे त्यांची क्षमा मागायला गेलो. पण दादांची भेट झाली नाही. दीड दोन तास मंत्रायलामध्ये त्यांच्या दालनाबाहेर मी बसून राहिलो. त्यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी चालली होती. खूप वेळ वाट पाहीली आणि मग निघून आलो. मी विचार केला कदाचित दादा अजूनही नाराज असतील, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे भेटले नाहीत, पण मी त्यांचा ऋणीमी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांकडेही वेळ मागितली. कारण २०१९ ला मला त्यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली. राजकारण काहीही असो त्यांच्या पक्षाकडून मला ही संधी मिळाली. मी अनिल परब यांना माझी इच्छा बोलून दाखवली. मात्र उद्धव ठाकरे यांना कदाचित कामामधून वेळ मिळाला नसावा. त्यामुळे त्यांची भेट घेता आली नाही. मात्र मी त्यांचा ऋणी आहे अशा शब्दात पाटील यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.