पिंपरी : ‘इंडिया’ आघाडीत लोकसभेची मावळची जागा कोणाला मिळणार आणि कोण उमेदवार असणार याबाबत संभ्रमावस्था असल्याने विरोधी आघाडीत सध्या शिथिलता आली आहे. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत. दैनंदिन व्यवहार सांभाळून कोणी सामाजिक कार्यात, तर कोणी धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. काहींनी विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून राजकारणात ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांचे कार्यकर्तेही मोर्चे, आंदोलने, सामाजिक कार्य करीत आहेत. मात्र, त्यांचे अस्तित्व नाममात्र दिसते. सध्या देशपातळीवर चर्चेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चा मोठा प्रभाव शहरात आहे. तुलनेने ‘इंडिया’ची ताकद कमी दिसत असली तरी प्रादेशिक पातळीवरील घटक असलेल्या ‘महाविकास आघाडी’तील पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे उद्योगनगरीत महाविकास आघाडी दिसते. पण, महाविकास आघाडीतही राजकीय शांतता दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : राजू शेट्टी यांचा एकाचवेळी अनेकांशी सामना

राज्यातील राजकीय समीकरणे बदल्याने शहरातील गणितेही बदलणार आहेत. शहरात ताकद असलेल्या अजित पवारांचा गट भाजपसोबत गेला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवारांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातले होते. परंतु, युवा संघर्ष यात्रेत ते व्यस्त असल्याने पक्षातील घडामोडी थंडावल्या आहेत. उद्घाटनापूर्वीच पक्षाचे जनसंपर्क कार्यालय बंद करण्याची नामुष्की ओढावल्यानंतर नवीन कार्यालय अद्यापही सुरु झालेले नाही. काँग्रेसमध्येही शांतता आहे. मावळ मतदारसंघावर दावा केल्यानंतर पुढे काँग्रेसकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. तर, ठाकरे गटाचे अस्तित्व दिसेनासे झाले आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाविकास आघाडीतील शहरातील तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपने पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले. आमदार महेश लांडगे वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन करत आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हेही सातत्याने बैठका घेत चर्चेत राहताना दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही हालचाली दिसतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval lok sabha seat confusion in india alliance and bjp shivsena ncp print politics news css