मुंबई : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप) राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढवणार आहे. पक्षाचा जनाधार घटल्याने व नेहमी ‘एकला चलो’च्या भूमिकेत असणाऱ्या ‘बसप’ने यावेळी महाराष्ट्रात समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. तसेच या निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारीस पक्षाचे प्राधान्य असणार आहे.
१९८४ मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर ‘बसप’ने महाराष्ट्रात १९९० पासून निवडणुका लढवण्यास प्रारंभ केला. ‘बसप’ला राज्यात अद्याप खाते उघडता आलेले नाही. मात्र नोकरदार व शिक्षीत मतदार ‘बसप’ने बांधून ठेवला आहे. संविधान बदल आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करणे यासंदर्भात काँग्रेसन पसरवलेला भ्रम दूर करण्यासंदर्भात पक्षाने गेल्या सहा महिन्यात अडीच हजार बैठका घेतल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
२००४ च्या विधानसभेला ‘बसप’ने राज्यात ४ टक्के मते घेत ७९ मतदारसंघात तिसरे स्थान पटकावले हाेते. राज्यात ‘बसप’चा जनाधार मात्र झपाट्याने घटला आहे. ‘बसप’ची जागा आता वंचित बहुजन आघाडीने पटकावली आहे. परिणामी, २०२४ च्या लोकसभेला या पक्षाला राज्यात ४७ मतदारसंघात अवघी ४ लाख २० हजार (०७ टक्के) मते मिळाली. पक्षाने यावेळी राज्यात समविचारी पक्षांबरोबर आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनिल डोंगरे (वर्धा) यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने ‘बसप’च्या काही उमेदवारांना निवडणुकीत पैसा पुरवल्याचे चव्हाट्यावर आले होते. ते पाहता या विधानसभेला ‘बसप’कुणाची मते खाणार आणि कुणाला मदत कुणाला होणार, याची उत्सुकता आहे.
‘बसप’ची रॅली –
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘बसप’ने दिक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी ‘आरक्षण रॅली’ आयोजित केली आहे. ३० सप्टेंबर रोजी या रॅलीचा नागपुरात प्रारंभ होणार असून ११ ऑक्टोबर रोजी मुंबईत सांगता होणार आहे.
‘बसप’ची विधानसभा कामगिरी –
वर्ष २००४- २७२ जागा लढवल्या. ७९ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर. १६ लाख ७१ हजार मते (४.१ टक्के).
वर्ष २००९- २८१ जागा लढवल्या. २९ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर. १० लाख ६५ हजार मते (२.४ टक्के).
वर्ष २०१४- २८० जागा लढवल्या. १६ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर. ११ लाख ९१ हजार मते (२.३ टक्के).
वर्ष २०१९- २६३ जागा लढवल्या. १६ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर. ५ लाख २५ हजार मते (०.९ टक्के).