साऱ्या देशाचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आज ( १ नोव्हेंबर ) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष ( आप ) यांच्यात लढत होत आहे. त्यातच दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. येत्या ४ डिसेंबरला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
भाजपाकडे महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस आणि आपकडून जोरदार प्रचारात करण्यात येत आहे. तर, आपच्या प्रचारासाठी बॉलिवूड गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मिका सिंगने आपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. त्यासाठी त्याने गाणेही गायलं आहे.
दिल्लीतील चांदणी चौकात आपच्या वतीने जनसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपचे उमेदवार सरदार पुर्नदीप सिंग साहनी यांच्या प्रचारासाठी ही जनसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार राघव चड्डा हे सुद्धा उपस्थित होते. या प्रचारसभेत मिका सिंग याने हजेरी लावली. तसेच, ‘सावन मे लग गयी आग’ हे गाण गात सरदार पुर्नदीप सिंग साहनी यांना मते देण्याचे आवाहन मिका सिंगने केलं आहे.
यावेळी बोलताना मंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “चांदणी चौक शान नाहीतर दिल्लीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जे दिल्लीतील लाखो नागरिकांना रोजगार देते. मात्र, तरीही भाजपा व्यावसायिकांना सुविधा देण्याच्या ऐवजी लुटत आहे. भाजपाने १५ वर्षापासून चांदणी चौकाला कचऱ्यात रुपांतरीत केलं आहे,” अशी टीका सिसोदिया यांनी केली.