दिल्ली महापालिका निवडणुकीचे ( एमडी ) निकाल हाती आले आहेत. २५० जागांसाठी ४ डिसेंबरला मतदान झालं होतं. त्यानंतर विविध माध्यमांनी दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला ( आप ) स्पष्ट बहुमत दाखवण्यात आलं. त्यात आज ( ७ डिसेंबर ) दिल्ली महापालिकेचे निकाल हाती आले आहे. त्यात ‘आप’ला १३४ मिळत दणदणीत विजय झाला आहे. तर, भाजपा १०४, काँग्रेस ९ आणि अन्य ३ असे उमेदवार निवडून आले आहेत.
छोटी विधानसभा मानले जाणाऱ्या दिल्ली पालिका निवडणुकीत ‘आप’ने भाजपाच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. दिल्ली विधानसभेनंतर आता पालिकेवर ‘आप’ची सत्ता आली आहे. मात्र, केंद्रातील सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कारण, या निवडणुकीसाठी भाजपाकडून ७ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री, १०० च्यावर खासदार प्रचारासाठी उतरवण्यात आले होते. तरीही, भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पण, भाजपाच्या काही दिग्गजांना आपलं गड सांभाळण्यात यश आलं, तर काहींच्या गडाला सुरुंग लागला आहे. ते आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : अनेक मंत्री- सहा मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांची फौज उतरवूनही दिल्लीत भाजप पराभूत
नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री असलेल्या मीनाक्षी लेखी या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या मतदारसंघात एकूण २५ प्रभाग होते. त्यात १९ जागांवर ‘आप’चे उमेदवार विजयी झाले आहे. तर, भाजपाला फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
पूर्व दिल्ली
खासदार गौतम गंभीर यांच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात ३६ प्रभाग येतात. या प्रभागात भाजपाला सर्वोत्तम अशी कामगिरी करता आली आहे. भाजपाचे १३ उमेदवार निवडून आले आहेत. तर, ‘आप’चे १३ आणि काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
पश्चिम दिल्ली
पश्चिम दिल्लीतून भाजपाचे खासदार परवेश वर्मा हे निवडून गेले आहेत. या लोकसभा मतदारसंघातंर्गत एकूण ३८ प्रभाग आहेत. त्यात ‘आप’च्या २५ उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, भाजपा १२ आणि काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला आहे.
उत्तर पश्चिम दिल्ली
हंसराज हंस हे उत्तर पश्चिम दिल्लीचे खासदार आहे. येथे एकूण ४३ प्रभाग असून, ‘आप’ने २२ जागांवर मुसंडी मारली आहे. तर, भाजपा १७, काँग्रेस ३ आणि अपक्ष १ उमेदवाराचा विजय नोंदवला आहे.
दक्षिण दिल्ली
३७ प्रभाग असलेल्या दक्षिण दिल्ली मतदारसंघातून रमेश बिधुरी हे लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या मतदारसंघात भाजपाला १३ जागांवर विजय मिळाला आहे. तर, ‘आप’ला २३ आणि काँग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागलं आहे.
उत्तर-पूर्व दिल्ली
भोजपुरी गायक मनोज तिवारी हे आपचे जुने प्रतीस्पर्धी. मनोज तिवारी हे दिल्लीतील ईशान्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या मतदारसंघातून भाजपाचे २१ उमेदवार निवडून आले आहेत. १५ जागांसह ‘आप’ दुसऱ्या क्रमांकावर तर, काँग्रेस तीन जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन अपक्ष उमेदवारांनीही या मतदासंघातून निवडणूक जिंकली आहे.
चांदणी चौक
चांदणी चौक ही दिल्लीची आर्थिक राजधानी. माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन हे चांदणी चौक मतदारसंघाचे खासदार आहे. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघातून भाजपाचे १६ उमेदवार निवडून आले. तर, ‘आप’ला १४ जागाचा मिळाल्या आहेत.