‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी अलीकडेच ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग घेतला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेधा पाटकर आणि राहुल गांधींवर टीका केली. मेधा पाटकर यांनी गेल्या तीन दशकांपासून नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या सरदार सरोवर धरणाला विरोध केला. यामुळे हा प्रकल्प बनण्यास उशीर झाला. तसेच त्यांनी कच्छ आणि काठियावाड परिसराला पाणी मिळू नये म्हणून हे आंदोलन केलं, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी यांच्या टीकेमुळे गुजरात निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण यावर गुजरातमधील काँग्रेस नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांच्या टीकेचा गुजरात निवडणुकीत काँग्रेसवर काहीच परिणाम होणार नाही. मोदींची प्रतिक्रिया म्हणजे भाजपाच्या मुद्दा भरकटवण्याच्या रणनीतीचा भाग आहे, असंही काँग्रेस नेत्याने सांगितलं.

रविवारी पंतप्रधान मोदींनी राजकोट जिल्ह्यातील धोराजी याठिकाणी प्रचारसभा घेतली होती. या सभेतून त्यांनी राहुल गांधी आणि मेधा पाटकर यांच्यावर टीकास्र सोडलं. “काँग्रेसच्या एका नेत्याने सरदार सरोवर धरणाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बेनच्या (बहिणीच्या) खांद्यावर हात ठेवले,” असं मोदींनी सभेत म्हटलं. पण भाजपासाठी, मेधा पाटकर केवळ नर्मदेवरील सरदार सरोवर धरणाविरोधातील आंदोलनाचा चेहरा नाहीत. तर त्या २००२ च्या गुजरात दंगलीविरोधात निदर्शने करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.

हेही वाचा- मंत्रिपदाची चर्चा अन् समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांची मेहरनजर

गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही शनिवारी ‘भारत जोडो यात्रे’तील राहुल गांधी आणि मेधा पाटकर यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत म्हटलं की, “काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी वेळोवेळी गुजरात आणि गुजराती लोकांबद्दल आपला वैर दाखवून दिलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून गुजरातला पाणी मिळू न देणाऱ्या घटकांच्या पाठिशी राहुल गांधी आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यासाठी त्यांनी मेधा पाटकर यांना भारत जोडो यात्रेत सहभागी करून घेतलं. हे गुजरात कदापि सहन करणार नाही.”

हेही वाचा- MCD Election: काँग्रेसच्या माजी खासदाराचा ‘आप’मध्ये प्रवेश, पुर्वांचली समाजाच्या मतांचा केजरीवालांना फायदा होणार?

या टीकेनंतर गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर म्हणाले की, पंतप्रधानांच्या टीकेचा निवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाही. जर ते (भाजपा) आम्हाला पाटकरांबद्दल प्रश्न विचारत असतील, तर आमच्याकडे भाजपाला विचारण्यासाठी हजारो प्रश्न आहेत. भारत जोडो यात्रेत कोणीही सामील होऊ शकतो. लोकांनी याच दृष्टीकोनातून याकडे पाहिलं आहे. पण भाजपाकडून यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेधा पाटकर या निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाहीत. पण लोक आता भाजपाला कंटाळले आहेत. गेल्या २७ वर्षांपासून भाजपा तेच-तेच बोलत आहात. त्यामुळे मेधा पाटकर यांनी भारत जोडो यात्रे सहभागी होण्याचा गुजरात निवडणुकीवर काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही, असं ठाकोर म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medha patkar join rahul gandhi bharat jodo yatra pm modi criticism congress gujarat poll rmm