मुंबई : भाजप प्रदेश कार्यालयात प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींची केंद्रीय प्रभारींना डोकेदुखी होवू लागल्याने तडीपार करण्यात आले आहे. प्रदेश प्रसिद्धीमाध्यमे विभागाची रवानगी कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कॉर्पोरेट कार्यालयात करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांची विरोधी पक्षात अधिक काळ राहिल्याने पूर्वीपासून प्रसिद्धीमाध्यमांशी चांगली मैत्री होती. मात्र राज्यात गेल्या दहा वर्षात महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षाचा काळ सोडता भाजप सत्तेत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवानी यांच्या काळातील पक्षाची कार्यपद्धती, वातावरण व वर्तणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या कार्यकाळात बदलली आहे. त्यामुळे आता निवडणूक काळात प्रदेश कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांचा वावर हा दिल्लीश्वर निवडणूक प्रभारींना डोकेदुखी ठरला आहे. नवी दिल्ली केंद्रीय कार्यालय, गांधीनगर आणि देशातील काही प्रदेश कार्यालयांमध्ये प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींचा वावर मर्यादित आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत असलेल्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना फारसे फिरकता येत नाही. मुंबईत मात्र प्रदेश कार्यालयातील सर्व नेत्यांची दालने, पहिल्या मजल्यावरील बैठकीचे दालन आदी ठिकाणी प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी सहजपणे जातात. ही बाब केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांना खटकली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशमध्ये १० पैकी नऊ जागांवरच पोटनिवडणूक का जाहीर झाली? अयोध्येतील मिल्कीपूरची पोटनिवडणूक का जाहीर झाली नाही?

हेही वाचा – आर्णी मतदारसंघात भाजप उमेदवार बदलविण्याच्या तयारीत! महायुती आणि महाविकास आघाडीत होणार लढत

निवडणूक काळात दररोज प्रचार यंत्रणा, सभा व दौऱ्यांचे नियोजन, नेत्यांच्या भेटीगाठी प्रदेश कार्यालयात होतात. त्यात अनेक बाबी गोपनीय असतात. पण त्या प्रसिद्धांकडे लगेच जातात. यादव यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यातील बाबी गोपनीय ठेवण्याची सूचना केली होती. पण बैठकीतील एका नेत्याने काही मुद्दे प्रसिद्ध माध्यमांकडे लगेच उघड केले. त्यामुळे यादव यांनी या नेत्याची कानउघडणीही केली. त्यामुळे निवडणूक काळात प्रदेश प्रसिद्धीमाध्यमे विभाग वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कॉर्पोरेट कार्यालयात स्थलांतरित करण्यात आला आहे. प्रसिद्धीमाध्यमे विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयांमध्ये अजिबात फिरकायचे नाही, या विभागाच्या दालनातील दिवे, वातानुकूलन यंत्रे बंद ठेवली जातात. तेथे कोणीही बसू नये आणि चहापाणीही देवू नये, पत्रकारांशी फारसे कोणी बोलू नये, अशा तोंडी सूचना संबंधितांना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
निवडणूक काळासाठी प्रसिद्धीमाध्यमे विभागाचे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू केलेले कार्यालय मात्र चकचकीत व सुंदर असून तेथे मुलाखतींसाठी स्टुडिओही उभारण्यात आला आहे. पत्रकार परिषदांसाठी मोठे दालन आहे. पत्रकारांनी प्रदेश कार्यालयात न जाता पत्रकार परिषदा व भेटीगाठींसाठी कॉर्पोरेट कार्यालयातच जावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रदेश कार्यालयातून प्रसिद्धी माध्यमे विभागाच्या स्थलांतराची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.