मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ईशान्येकडील या राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल लागणार आहे. मेघालय हे असे राज्य आहे, जिथे महिलांची मतं निर्णायक ठरतात. मेघालय विधानसभेच्या ६० पैकी ३६ जागा अशा आहेत, जिथे महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. असं असलं तरीही मेघालयच्या राजकारणात महिलांचा सहभाग नगण्य आहे.
मेघालयमध्ये स्थानिक राजकीय पक्षांचं वर्चस्व आहे. असं असूनही भाजपाने या निवडणुकीत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. भाजपाला मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) कडून खूप आशा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि एनपीपीने युती करून राज्यात सरकार स्थापन केलं होते. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपाने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या.
हेही वाचा- जुनी निवृत्ती वेतन योजना विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू
त्या निवडणुकीत भाजपाने ४७ जागांवर निवडणूक लढवली होती. यातील केवळ दोनच जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. तर एनपीपीला २० जागा मिळाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर भाजपाने एपीपीशी युती केली. कोनराड संगमा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. भाजपाला दोन जागा मिळूनही सरकारमध्ये बसण्याची संधी मिळाली. सध्या दोन्ही पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. अशा स्थितीत भाजपा आणि एनपीपीने स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे. मात्र निवडणुकीनंतर भाजप आणि एनपीपी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा- “काँग्रेसला संंपवण्यासाठी नरेंद्र मोदी- ममता बॅनर्जींनी..,” काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप
दुसरीकडे, आगामी मेघालय विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अधिक आव्हानात्मक बनली आहे. कारण काँग्रेसचे अनेक आमदार इतर पक्षात गेले आहेत. मेघालय विधानसभेत सध्या काँग्रेसचे केवळ दोनच आमदार शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत मेघालयात काँग्रेसला सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागणार आहे. आता हा संघर्ष अधिक आव्हानात्मक होऊ शकतो, कारण काँग्रेसनेही स्वातंत्र्यपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी टीएमसीही निवडणुकीच्या मैदानात आहे.