मेघालयमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेत बोलत असताना राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. यावर तृणमूल काँग्रेसकडून राहुल गांधींवर पलटवार करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने राहुल गांधींच्या भाषणाला त्यांची अपरिपक्वता म्हटलं आणि काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष जयप्रकाश मजूमदार यांनी म्हटले की, मेघालयमध्ये राहुल गांधी ज्याप्रकारे तृणमूल काँग्रेसवर टीका करत आहेत, यातून त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. ते कधीच विचार करत नाहीत की ते पुढे काय करणार आहेत. जर काँग्रेस बळकट झाली नाहीतर भाजपाल रोखणे अवघड आहे. लोकांना वाटतं की, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी परिपक्व झाले असतील, मात्र आम्हाला असे वाटत नाही. काँग्रेसला आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यांना आघाडी करण्याची गरज आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी –

राहुल गांधी म्हणाले, “तुम्हाला टीएमसीचा इतिहास माहितीये का? बंगालमध्ये होत असेलल्या हिंसाचाराबाबत तुम्ही जागरूक असालच. बंगालमध्ये होत असलेले घोटाळे देखील तुम्हाला माहीत असतील. शारदा घोटाळ्याबाबत आपण ऐकले असेल. तृणमूल काँग्रेसची एकूणच काम करण्याची पद्धत सर्वांना परिचित आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या निवडणुकीत उतरला होता, तिथे खूप पैसा खर्च करण्यात आला. तिथे त्यांनी भाजपाला एकप्रकारे मदतच केली. मेघालयमध्ये देखील भाजपाला मदत करणे हाच त्यांचा उद्देश आहे. भाजपाला मजबूत करणं, त्यांना विजय मिळवून देण्यासाठीच तृणमूल याठिकाणी निवडणुकीत उतरली आहे.”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या पहिल्याच प्रचारसभेमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली. भाजपचे वर्तन हे वर्गातील दांडगट मुलासारखे आहे, आपल्याला सर्व काही समजते असे त्यांना वाटते त्यामुळे ते कोणाचेच काही ऐकून घेत नाहीत अशा शब्दांमध्ये राहुल यांनी भाजपवर हल्ला चढवला. मेघालयमध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी तृणमूल काँग्रेस प्रयत्नशील आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस स्वबळावर –

मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळाव लढवत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ मार्चला होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meghalaya elections trinamool congress response to congress leader rahul gandh criticism msr