Meghalaya govt formation: मेघालयमध्ये सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष असलेल्या एनपीपीला बाजूला सारून वेगळी राजकीय आघाडी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काल (रविवार, ५ मार्च) युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (UDP) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) या पक्षांनी कोनराड संगमा यांच्या एनपीपी पक्षासोबत युती करत सरकारला पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांनी आपल्या समर्थनाचे पत्र कोनराड संगमा यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर कोनराड संगमा यांनी ट्विटवर लिहिले, “युडीपी आणि पीडीएफ या पक्षांनी सरकारस्थापनेसाठी एनपीपीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार. राज्यातीलच दोन महत्त्वाच्या पक्षांची साथ मिळाल्यामुळे आता मेघालय आणि मेघालयच्या जनतेसाठी आम्हाला ठोस असे काम करणे शक्य होणार आहे.”
दरम्यान शनिवारपर्यंत युडीपी पक्ष तिसरी आघाडी स्थापन करून तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याची आखणी करत होता. यूडीपीला विधानसभा निवडणुकीत एनपीपी पक्षानंतर सर्वाधिक ११ जागा मिळाल्या आहेत. जर सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवता आले नाही तर आम्ही विरोधात बसू असेही यूडीपीचे नेते सांगत होते. मात्र रविवारी अचानक यूडीपीने घुमजाव करत आपले समर्थन जुना सहकारी असलेल्या एनपीपीच्या पारड्यात टाकले. युडीपीची अचानक बदललेली भूमिका जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाने त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही नेता प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.
मेघालयमध्ये २७ फेब्रुवारी रोजी ५९ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर २ मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागला. निकालात एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही. निकालाच्या काही तासांतच दोन जागा जिंकणाऱ्या भाजपाने सर्वाधिक २६ जागा जिंकलेल्या एनपीपीला आपले समर्थन देऊ केले. दुसऱ्याच दिवशी एनपीपी आणखी दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. तसेच हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (HSPDP) या पक्षाच्या दोन आमदारांनीदेखील त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे एनपीपीकडे ३२ आमदारांचा पाठिंबा झाला होता. बहुमतासाठी लागणाऱ्या ३१ संख्येहून एक आमदार अधिक होता.
मात्र, एचएसपीडीपीने अचानक घुमजाव करत एक निवेदन जाहीर केले. ज्यामध्ये त्यांच्या दोन आमदारांनी एनपीपीला दिलेला पाठिंबा अधिकृत नसल्याचे सांगितले. युडीपी पक्षाने सुरू केलेल्या नव्या युतीच्या प्रयत्नांमुळे हा पाठिंबा काढून घेतल्याची चर्चा होती. तसेच एनपीपी आणि भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून एक नवी युती तयार करण्याचा प्रयत्न केला जात होता.
कोनराड संगमा यांनी शनिवारी जाहीर केले की, सत्तास्थापनेसाठी एनपीपी पक्षाला राज्यपालांकडून निमंत्रण आलेले आहे. मात्र त्याचवेळी युडीपीकडून युतीच्या हालचाली सुरू होत्या, सत्तास्थापनेसाठीचे संख्याबळ आमच्याकडेच आहे, असे दावे ते करत होते. दरम्यान शिलाँगच्या काही भागात एचएसपीडीपीच्या आमदारांनी एनपीपीला पाठिंबा दिल्याबद्दलची तीव्र प्रतिक्रिया उमटली. काही दबाव गटांनी दोन्ही आमदारांचे पुतळे जाळले आणि एका आमदाराच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला.
तथापि, रविवारी रात्री कोनराड संगमा दुसऱ्यांदा सरकार स्थापनेसाठी सज्ज झाले. एनपीपीकडे आता ६० सदस्यांच्या सभागृहात तब्बल ४५ आमदारांचे भक्कम असे संख्याबळ आहे. संगमा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मंगळवारी राजभवन येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता आहे.