विविध राज्यांमध्ये असलेल्या प्रादेशिक पक्षांतील नेत्यांची मुले-मुली राजकारणात येत आहेत. भाजपाकडून प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात येत असतो. आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (PDP) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्तीही राजकारणात सक्रिय होत आहे. इल्तिजा चार वर्षे आपली आई मेहबुबा मुफ्ती यांचे सोशल मीडिया हाताळत होती. आता पक्षाने त्यांच्यावर मेहबुबा मुफ्ती यांच्या माध्यम सल्लागार या पदाच्या कामाची जबाबदारी सोपवली आहे. पीडीपी पक्षाने एक निवेदन काढून हा निर्णय जाहीर केला. इल्तिजा मुफ्ती २०१९ पासून पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचे सोशल मीडिया हाताळत होत्या. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर अनेक नेते नजरकैदेत होते, त्यावेळी इल्तिजा मुफ्ती या निर्णयावर जोरदार टीका करून चर्चेत आल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इल्तिजा मुफ्ती या आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात येतील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. चार वर्षांपासून आईचा सोशल मीडियाचा कारभार हाताळताना इल्तिजा यांचा पक्षाशी संबंध येत होता. आई मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याप्रमाणेच इल्तिजादेखील राजकारणात येणार, असा अंदाज होता.

हे वाचा >> …आणि आगामी काळात राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल – महबूबा मुफ्तींचं विधान!

३६ वर्षीय इल्तिजा यांना मात्र हे पद राजकीय असल्याचे वाटत नाही. मला नाही वाटत की, मी अधिकृतपणे राजकारणात उतरले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. “माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माध्यमांना कशा पद्धतीने सामोरे जावे, याबद्दल सल्ला देण्याचे काम मला देण्यात आले आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी माध्यमे हे मुख्य व प्रभावी साधन बनले आहे. या विषयातून बरेच काही साध्य केले जाऊ शकते, असे मला वाटते. जर माझ्या सल्ल्याने त्यांना (मेहबुबा मुफ्ती) आपला संदेश आणखी व्यापक स्तरावर पोहोचवता येत असेल, तर माझ्या कामाचे चीज झाले, असे मी मानेन. त्यांना माध्यमांसमोर प्रभावीपणे घेऊन जाणे, एवढेच माझे काम आहे”, अशी प्रतिक्रिया इल्तिजा यांनी दिली.

माध्यम सल्लागार पद आणि मुख्य राजकारण याच्यात अंतर असल्याचे इल्तिजा मानतात. “मी संघटनेचे पद घेतलेले नाही. तिथे माझे काहीही काम नाही. काश्मीरसारख्या राज्यात प्रत्येक गोष्ट राजकीय आहे, याची मला कल्पना आहे. जेव्हा मी मुख्य प्रवाहातील राजकारणात सक्रिय होईन, तेव्हा ते सर्वांनाच दिसेलच”, असेही त्या म्हणाल्या.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर इल्तिजा यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. अशा वेळी इल्तिजा याविरोधात जोरदार आवाज उठवीत होत्या. टीव्ही चर्चांमध्ये त्यांना स्थान मिळत होते. त्यानंतर इल्तिजा यांनी आपल्या आईचे सोशल मीडिया हँडल चालवायला घेतले; ज्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांच्या सोशल मीडिया हँडलवर फॉलोअर्सची संख्या वाढलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा >> भाजपकडून अनुच्छेद ३७० रद्द न करण्याचे वचन; मेहबूबांच्या चर्चेचा दाखला देत उद्धव ठाकरे यांची टीका

मेहबुबा मुफ्ती यांना १४ महिन्यांनंतर तुरुंगातून मुक्त करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना इल्तिजा या मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला उभ्या असल्याचे दिसले. जून २०२२ साली एक्स या सोशल मीडिया साईटवर ‘आपकी बात इल्तिजा के साथ’ हा संवाद कार्यक्रम इल्तिजा यांनी सुरू केला. या कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले.

इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवी घेतलेली आहे. तसेच वॉर्विक विद्यापीठातून (Warwick University) आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehbooba muftis daughter iltija mufti gets a step up in pdp party short of a political role kvg