अमरावती : महायुतीकडे उमेदवारी मागणाऱ्या जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांची फरफट होत असून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीने उमेदवारी नाकारली आहे, तर मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना महायुतीची उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाल्याने त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे.
मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते मुंबईत ठाण मांडून होते. पण, त्यांना अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली, त्यातही मोर्शी मतदारसंघाचे नाव नसल्याने देवेंद्र भुयार समर्थक निराश झाले आहेत. त्यातच देवेंद्र भुयार यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील ‘वॉल’वरून अजित पवार यांचे छायाचित्र हटविल्याने त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी चालवल्याची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा – हिंगणघाटमधून आघाडीचे अतुल वांदिले, तैलिक संघटनेच्या प्रभावाने तीन उमेदवार
महायुतीने मोर्शी मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही. ही जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे हे आग्रही आहेत. भाजपने दबाव वाढविल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला नमते घ्यावे लागले, अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार हे वरूड येथे आयोजित जनसन्मान यात्रेला उपस्थित राहल्याने भुयार समर्थकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, ती अपेक्षा पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने भुयार समर्थक नाराज झाले आहेत. अद्याप महाविकास आघाडीने देखील मोर्शीतून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे रहस्य कायम आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेले मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांना महायुतीने उमेदवारी नाकारली. त्यामुळे ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. पण, काँग्रेसने शनिवारी रात्री उमेदवाराचे नाव घोषित करून चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे राजकुमार पटेल यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. भाजप, बसप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असल्याने ते आता इतर कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार की अपक्ष म्हणून रिंगणात येणार, याची उत्सुकता आहे.
भाजपने महायुतीत दर्यापूर, बडनेरा आणि अमरावती या तीन जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या, पण इतर पाच जागांवर हक्क सांगितला आहे. अचलपूर, धामणगाव आणि मेळघाटमधून भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत.
© The Indian Express (P) Ltd